
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ तालुक्यातील बारा ग्रामपंचायती पेपरलेस बनल्या आहेत. या ग्रा.पं.चा कारभार ऑनलाईन पद्धतीने चालणार असून सर्व प्रकारचे दाखले ई ग्राम प्रणालीत उपलब्ध होणार आहेत. कोकण विभागात एकाच वेळी बारा ग्रामपंचायती पेपरलेस करणारी कुडाळ पंचायत समिती पहिली ठरली आहे, अशी माहिती सभापती राजन जाधव व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.
तालुक्यातील पणदूर, आंदुर्ले, हुमरमळा (वालावल), हुमरस, नानेली, कालेली, आवळेगाव, डिगस, गोठोस, वाडीवरवडे, मांडकूली, तुळसुली कर्याद नारूर या बारा ग्रा.पं.नी पहिल्या टप्प्यात ग्रा.पं.चे 1 ते 33 लेखे ई ग्राम स्वाफ्ट मध्ये फिडिंग करून जनतेसाठी पेपरलेस सुविधा निर्माण केली आहे. या ग्रा.पं.चा गौरव सोहळा मंगळवारी पं.स.येथे पार पडला. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि.प.उपाध्यक्ष रणजित देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरेश जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) कमलाकर रणदिवे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) खांडेकर, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) श्रीपाद पाताडे, उपसभापती सौ.श्रेया परब, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सदस्य मिलिंद नाईक, गोपाळ हरमलकर, बाळकृष्ण मडव, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळे, विस्तार अधिकारी आर.डी.जंगले, संजय ओरोसकर आदींसह सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
यावेळी पेपरलेस ग्रा.पं.चे सरपंच, ग्रामसेवक व केंद्रचालक यांना गौरव प्रमाणपत्र देवुन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यामध्ये पणदूर सरपंच दादा साईल, हुमरस सरपंच अनुप नाईक, तुळसुली कर्याद नारूर सरपंच नागेश आईर, आंदुर्ले सरपंच सौ.पुजा सर्वेकर, कालेली सरपंच शितल कालेलकर, नानेली सरपंच प्रज्ञेश धुरी, आवळेगाव सरपंच सखाराम (सुनील) सावंत, डिगस सरपंच सतीश सुर्वे, गोठोस सरपंच सानिका डिंगे, हुमरमळा सरपंच सौ.अर्चना बंगे, मांडकूली सरपंच तुषार सामंत आदींसह ग्रामसेवक व केंद्रचालकांचा गौरव करण्यात आला.
या ग्रा.पं.चा कारभार ऑनलाईन पद्धतीने चालणार आहे. या ग्रा.पं.कडून जन्म नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, विवाह दाखला, मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र, विज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, नोकरी व्यवसायासाठी प्रमाणपत्र, कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र, हयातीचा दाखला अशा स्वरूपाचे 19 प्रकारचे दाखले ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने ई ग्राम प्रणालीत उपलब्ध होणार आहेत. तालुक्यातील उर्वरित ग्रा.पं.नीही पेपरलेस ग्रा.पं.करण्यास आघाडी घेतल्याचे सभापती श्री. जाधव व गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितले.






























































