
सामना ऑनलाईन । मुंबई
आकस्मिक मृत्यू झालेल्या रुग्णांचे शवविच्छेदन हा नातेवाईकांसाठी मोठा मानसिक आघात असतो. आपल्या माणसाच्या अचानक जाण्याच्या धक्क्यातून नातेवाईक सावरलेले नसतानाच शवविच्छेदनामध्ये त्याच्या शरीराची होणारी चिरफाड, त्यातून त्याच्या देहाची होणारी विटंबना याची कल्पनाही नातेवाईकांना काळीज पिळवटून टाकणारी असते. मात्र येत्या काही काळात पालिकेच्या नायर रुग्णालयात ‘व्हर्च्युअल ऑटोप्सी’चे तंत्रज्ञान विकसित होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे चिरफाड न करता शवविच्छेदन होऊ शकणार आहे.
शवविच्छेदनाची मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली प्रकरणे आणि तोकडी पडणारी यंत्रणा यामुळे शवविच्छेदन करणार्यांवरचाही ताण गेल्या काही वर्षांत वाढलेला आहे. त्यामुळे शवविच्छेदन करताना देहाची विटंबना केल्याचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. तसेच शवविच्छेदन करणार्या कर्मचार्यांनाही विच्छिन्न देह बघून मानसिक त्रास होत असतो. या सगळ्यावर उपाय म्हणून ‘व्हर्च्युअल ऑटोप्सी’ अर्थात आभासी शवविच्छेदन करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली होती. गटनेत्यांच्या बैठकीतही या मागणीला सर्वपक्षीय सदस्यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर आता प्रशासनाने पालिकेच्या नायर रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर हे तंत्रज्ञान आणण्याचे ठरवले आहे. त्याकरिता नायर रुग्णालयात सध्याच्या शवागाराजवळची जागाही निश्चित करण्यात आली असून त्यानंतर केईएम, शीव, कूपर अशा इतर रुग्णालयांमध्येही व्हर्च्युअल शवविच्छेदन सुरू होऊ शकेल. दिल्लीत एम्समध्ये दोन वर्षांपूर्वी व्हर्च्युअल शवविच्छेदन सुरू झाले आहे. त्यानंतर पालिकेच्या रुग्णालयातच पहिल्यांदा हे तंत्रज्ञान येणार आहे. अर्थसंकल्पातही याकरिता आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची माहिती रईस शेख यांनी दिली. नायर रुग्णालयात अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्यासाठी नुकतीच वैद्यकीय व प्रशासकीय अधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल तसेच शीव व नायर रुग्णालयांचे अधिकारी व सपचे गटनेता रईस शेख उपस्थित होते.
असे काम करेल व्हर्च्युअल ऑटोप्सी
- एमआरआय आणि सीटीस्कॅन यंत्रांच्या मदतीने शरीरातील जखमांची पाहणी करून अहवाल तयार करण्यात येईल.
- यंत्रांच्या सहाय्याने शरीराचे स्कॅनिंग करून कोणतीही चिरफाड न करता बाह्य व अंतर्भागातील जखमा पाहता येतील. यामुळे मृत्यूच्या कारणांची अधिक विस्तृत व काटेकोर मीमांसा होऊ शकेल.
- परंपरागत शवविच्छेदनासाठी लागणारा तासन्तासाचा वेळही कमी होईल. या प्रकारच्या शवविच्छेदनासाठी साधारण 30 ते 45 मिनिटे लागतात.
30 टक्के प्रकरणे गुन्हेगारी स्वरूपाची
शवविच्छेदनामध्ये सुमारे 30 टक्के गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे असतात. त्यामुळे व्हर्च्युअल शवविच्छेदनाचे फायदे-तोटे, त्याची कायदेशीर बाजू तपासण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून 15 सप्टेंबरपर्यंत याबद्दल माहिती गोळा केली जाणार आहे. तर दुसर्या बाजूला यासाठी लागणार्या एमआरआय, सीटीस्कॅन अशा यंत्रांसाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
दरवर्षी होणारे शवविच्छेदन
- शीव रुग्णालय 4000
- नायर रुग्णालय 1500
- केईएम रुग्णालय 3000



























































