
सामना प्रतिनिधी । नगर
विविध मागण्यांसाठी राज्यातील ऊसतोडणी कामगार मुकादम व वाहतूकदारांनी संप सुरू केला आहे. या संपात राज्यातील एक लाख ऊसतोडणी कामगार मुकादम सहभागी झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी गुरुवारी दिली.
संपाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महागाईच्या काळात सध्याच्या दरात काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे हा संप सुरू करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
थोरे म्हणाले, ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत दुप्पट वाढ करावी, मुकादमाच्या कमशिनमध्ये दुप्पट वाढ करावी, राज्य सरकारने जाहीर केलेली 2014-15 ची 20 टक्के दरवाढ मिळावी, हार्वेस्टरमुळे ऊस तोडणी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांना मशिनप्रमाणे दर देण्यात यावा, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ऊसतोडणी कामगार सुरक्षा विमा योजनेची अंमलबजावणी करारामध्ये ठरवल्याप्रमाणे राज्य शासनाने करावी, अनेक कारखाने कामगारांचा विमा उतरवत नाहीत. त्यामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व शारीरिक नुकसान होत आहे. त्यामुळे साखर आयुक्तांमार्फत विमा उतरवल्याशिवाय गळिताचा परवाना देऊ नये, विम्याची रक्कम शासनाने भरावी, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्याच भागात निवासी आश्रमशाळा सुरू करण्यात याव्यात, ऊसतोडणी कामगार व मुकादम यांना सरकारच्या कामगार विभागाकडून ओळखपत्र देण्यात यावे, शासनाच्या निधीतून कामगारांना घरकुल द्यावे, कामगारांसाठी कल्याण मंडळाची स्थापना करावी. या प्रश्नावर गेल्या 35 वर्षांपासून आपण लढा देत आहोत, आतापर्यंत सरकारने या प्रश्नात लक्ष घातले नाही, असा आरोप त्यांनी केला.































































