‘त्यांच्या’ खांद्यात इतिहास घडविण्याची कुवत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

लॉर्डस्च्या राखेतून पुन्हा ज्वाळा बनलेल्या हिंदुस्थानी संघाचं कौतुक वाटतं, पण मालिका जिंकून जो रूटच्या स्वप्नांची ‘राखरांगोळी’ करायची असेल तर काही भगदाडं बुजवावी लागतील.

उदा. आपली फलंदाजी अजूनही स्वयंप्रकाशित नाही. विराट कोहली लवकर बाद झाला तर काळोख पडायला वेळ लागणार नाही.

होय, पुजाराने एक आशेचा दिवा पेटवलाय. कसोटी खेळी कशी असावी याचं ‘बौद्धिक’ त्याने एजेस बाउलवर घेतलं. प्रत्येक फलंदाज हा विराट कोहलीची गुणवत्ता घेऊन जन्माला येत नाही. इतरांचं गुणवत्तेचं गाठोडं कमी-जास्त असतं, पण मर्यादेत राहून खेळी कशी उभारावी हे पुजाराने दाखवून दिलं. त्या खेळीच्या शेवटच्या सत्रात इशांत-बुमराहला बरोबर घेऊन खेळताना काही धाडसी फटकेही त्याने दाखवले. ते नेहमी दिसत नाहीत. धावा झाल्या, आत्मविश्वास स्वगृही परतला की दबून राहिलेले फटकेही धीट होतात. ते पुजाराच्या बाबतीत झाले. रहाणेच्या बाबतीत ते कधी होणार?

आपली आघाडीची जोडी ही इंग्लंडच्या आघाडीच्या जोडीपेक्षा अंमळ जास्त चांगली आहे एवढेच म्हणता येईल. अजूनही आधी पुजारा आणि मग कोहली ‘पडेल’ चेहऱयाचा धावफलक पाहतच फलंदाजीला येतात. या मालिकेत सात डाव होऊनही त्यात सुधारणा फारशी नाही. मधल्या फळीची कथाही फार वेगळी नाही. मोईन अलीच्या ऑफस्पिनपुढे हिंदुस्थानी संघ धबधब्यासारखा कोसळला. धबधब्याचा ‘कोसळणं’ हा धर्म आहे. मधल्या फळीचं तसं नाही. शेपटाला सुरुवात रहाणेपासून व्हावी हे क्लेशदायक आहे. मोईन अली हा काही जिम लेकर, डेव्हिड अॅलन किंवा स्वॉन नाही. तो हंस नसेल, पण बदकही नाही. गोलंदाजीच्या बुटमार्क्सचा त्याने थोडा फायदा उठवला, पण हे क्रिकेटच्या जन्मापासून सुरू आहे. वेगात-टप्प्यात मोईनने बदल केला, पण कसोटी दर्जाच्या गोलंदाजाकडून ते अपेक्षित आहे. अपेक्षित नव्हतं, स्पिन गोलंदाजीच्या दुधावर जन्मापासून पोसलेल्या हिंदुस्थानी फलंदाजांनी चांगल्या खेळपट्टीवर नांगी टाकणं. रिषभ पंतला कसोटी क्रिकेट ही कुठल्या दर्जाची अग्निपरीक्षा आहे कळलं असेल. इंग्लंडमध्ये त्याच्या यष्टिरक्षणाचीही परीक्षा झाली. अभ्यास अजून खूप बाकी आहे हे त्यालाही कळलं असेल. इंग्लंडमध्ये चेंडू युगेन् युगं स्विंग होतोय. यावेळी अनेकदा फलंदाजाला ओलांडल्यावर चेंडू भन्नाट स्विंग झालाय. गोलंदाजांनाही स्विंगवर नीट ताबा मिळवणं कठीण गेल्यामुळे लेगसाइडला चेंडू भरकटले आहेत. पण याचा अभ्यास करून यष्टिरक्षकाने सरकायला हवंय. रिषभ पंतने दिलेल्या सर्वच बाइज या न थोपवण्यासारख्या नव्हत्या. यष्टिरक्षकाचं मोठेपण त्याच्या लेगसाइडच्या यष्टिरक्षणावर जास्त ठरतं. कारण तो पेपर कठीण असतो. त्याच्या पहिल्याच कसोटीत त्याने षटकाराने खातं उघडलं होतं. टी-20त जाणवलं की, त्याच्या भात्यात अनेक फटके आहेत. मग अचानक 29 चेंडू तो आदराने का खेळला? कसोटीत चांगल्या चेंडूला आदर द्यायचा असतो, पण काही चेंडूंचा अनादर केल्याशिवाय धावा होत नाहीत. इशांत-बुमराह या दोन गोलंदाजांनी वरच्या फलंदाजांना दाखवून दिलं की, वेळप्रसंगी ते लढू शकतात तर वरचे फलंदाज का लढत नाहीत? शेवटी एवढंच मला सांगायचंय की, आपल्या वेगवान गोलंदाजांच्या कर्तृत्वाला फलंदाजांनी अपशकून करू नये. इंग्लंडमध्ये इतिहास घडवायची त्यांची कुवत आहे. त्यांना थोडी तरी धावांची ऊब द्या.