
सामना प्रतिनिधी। धाराशिव
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्या वतीने धाराशिव येथे दिनांक ७, ८ व ९ सप्टेंबर असे तीन दिवस राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता येथील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी नाट्यगृहात या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्या वतीने धाराशिव येथे प्रथमच राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य तथा जेष्ठ रंगकर्मी विजय कदम यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेसाठी तब्बल ४२ संघानी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये मुंबई येथील १६, नाशिक येथील ६, पुणे व नगर येथून प्रत्येकी ४, नांदेड येथून ३ तर सोलापूर, कोल्हापूर, सांगली व धाराशिव जिल्ह्यातून प्रत्येकी २ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशी माहिती या एकांकीका स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आमदार राणाजगजितसंह पाटील यांनी दिली. ही एकांकीका स्पर्धा म्हणजे धाराशिव शहरासाठी अभिमानाची बाब असून या स्पर्धेमुळे या जिल्ह्यातील युवक – युवतींना अभिनयाची चांगली संधी मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास ५१ हजाराचे पारितोषिक देण्यात येणार असून सर्व संघानी आपल्या एकांकीका दर्जेदारपणे सादर कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले.
दिनांक ७ सप्टेंबर रोजी १३, ८ सप्टेंबर रोजी १६ तर ९ सप्टेंबर रोजी १३ एकांकीका सादर करण्यात येणार असून दिनांक ९ रोजी सायंकाळी या स्पर्धेचा समारोप आमदार राणाजगजितसिंह पाटील व अभय साळुंके यांच्या उपस्थित होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
ही एकांकीका स्पर्धा तरुणांना अभिनय क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी उपयोगी पडणार असून या स्पर्धेत परिक्षंकाची सुध्दा कसोटी लागणार आहे. या एकांकीका स्पर्धेसाठी राजाश्रय मिळाला ही महत्वाची गोष्ट असून ही स्पर्धा एक चळवळ व्हावी अशी अपेक्षा जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी यावेळी व्यक्त केली. तर नुकत्याच संपन्न झालेल्या नाट्यसंमेलनास चांगल्या प्रतिसाद देणाऱ्या या पत्रकारांनी याही राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेस चांगला प्रतिसाद देवून सहकार्य करावे अशी अपेक्षा आयोजन समितीचे प्रमुख कार्यवाह धनंजय शिंगाडे यांनी यावेळी व्यक्त केली.






























































