
सामना ऑनलाईन, मुंबई
वाढत्या लोकसंख्येमुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दररोज जीवघेण्या गर्दीचा सामना करावा लागतो. असे असतानाही मुंबईत येणाऱ्या लोंढय़ांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. या परप्रांतीयांच्या लोंढय़ांमुळेच मुंबईच्या लोकलसेवेवर ताण येऊन विपरीत घटना घडत असल्याची खंत हायकोर्टाने आज व्यक्त केली.
प्रभादेवी रेल्वे स्थानकात गेल्या वर्षी 29 सप्टेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा बळी गेला तर 39 जण जायबंदी झाले. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या स्मिता ध्रुव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. संपूर्ण देशभरातील रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांच्या एकतृतीयांश प्रवासी हे मुंबईच्या लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे लोकल सेवेवर ताण पडत असल्याने हायकोर्टाने याबाबत चिंता व्यक्त केली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी रेल्वे प्रशासनाची बाजू मांडताना सांगितले की याठिकाणी नवीन पूल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना याठिकाणी घडण्याची शक्यता कमी आहे.
महिलांचे डबे वाढविण्याची गरज नाही
लोकलमधील महिलांचे डबे वाढविण्यात यावेत अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. लोकलमध्ये महिलांसाठी पुरेसे डबे असून महिलांच्या सोईकरिता रेल्वेमार्गावर महिला विशेष गाडय़ाही चालविल्या जातात. तर 15 डब्यांच्या लोकलमध्ये महिलांसाठी आणखी एक स्वतंत्र्य डबा असल्यामुळे त्यांची सोय होत आहे. त्यामुळे महिलांचे डबे वाढविण्याची गरज नसल्याचे सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले.



























































