
सामना ऑनलाईन, मुंबई
कुर्ला रेल्वे स्थानकाजवळील संरक्षक भिंत कोसळून चारजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. जखमींना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वर्दळीच्या ठिकाणीच ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसह नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. स्थानकाच्या बाजूला असलेली विविध प्रकारची दुकाने, बस स्थानक, रिक्षा स्टॅण्ड तसेच जवळच असलेला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. अशा गजबजलेल्या ठिकाणी सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला राममहल हॉटेलजवळ रेल्वेची संरक्षण भिंत कोसळली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसेच एल वॉर्डचे अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या घटनेत चार जण जखमी झाले. त्यांना त्वरित कुर्ला येथील भाभा रुग्णालयामध्ये नेण्यात आले. जखमींमध्ये सिराज (30), लखन खताल (29), लक्ष्मण पाटील (40) व अमीर कासीन (58) यांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती सुधारली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळेच भिंत कोसळली
कुर्ला स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकला लागून असलेली कंपाऊंडची भिंत जीर्ण झाली आहे. सुमारे 15 फूट उंच असलेल्या या भिंतीला लागूनच रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळे भविष्यात ही भिंत कोसळून अपघात होण्याची भीती असल्याने आमदार मंगेश कुडाळकर यांनी सदर भिंत काढून नव्याने भिंत बांधण्याची मागणी दोन वर्षांपूर्वी रेल्व प्रबंधकांकडे केली होती. तसेच वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने महिनाभरापूर्वी रेल्वे आणि पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची बैठक घेऊन धोकादायक जीर्ण भिंत हटवण्याबाबत बजावले होते, मात्र त्याकडे पालिकेबरोबरच रेल्वे अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्यानेच आज अपघात घडला आहे. त्यास रेल्वेचे अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे या अपघाताची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱयाला निलंबित करण्याची मागणी केली.
धोकादायक भिंत काढून नव्याने बांधा
भिंत कोसळून अपघात झाल्याची माहिती मिळताच मंगेश कुडाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच रेल्वे कंपाऊंडची सुमारे 200 फूट लांब जीर्ण भिंत आहे. त्यापैकी आज सुमारे 50 फुटांचा भाग कोसळला आहे. उर्वरित भाग कोसळून पुन्हा अपघात होऊ नये म्हणून ती तत्काळ हाटवण्याची मागणी केली. याप्रसंगी माजी शाखाप्रमुख कमलाकर बने, उपशाखाप्रमुख दीपक देसाई आदी उपस्थित होते.
उद्यानाला परवानगी दिली नाही
रेल्वे स्थानकाला लागून पश्चिमेला रेल्वेची मोकळी जागा आहे. तेथे नेहमी गर्दुल्ल्यांचा वावर असतो. त्यामुळे या जागेवर आपल्या आमदार निधीतून उद्यान बनवून सुशोभीकरण करू. त्यासाठी रेल्वेने ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता, मात्र रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजही ती जागा पडून असल्याचे मंगेश कुडाळकर यांनी सांगितले.
.























































