
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
योगगुरू बाबा रामदेव यांनी युपीए सरकार सत्तेत असताना भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात आक्रमक भुमिका घेतली होती. काळ्या पैशाविरोधातील लढाई जिंकायची असेल तर नरेंद्र मोदींना निवडून द्यायचे आवाहनही त्यांनी केले होते. मोदी सरकारला ४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर परिस्थितीत काय फरक पडलाय असा प्रश्न आज बाबा रामदेव यांना विचारण्यात आला. यावर रामदेव यांनी विदेशातील काळापैसा अद्यापही देशात परत न आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘हा काळा पैसा परत येत नाहीये हे पाहून मला दु:ख होतंय, घोटाळेबाज सातासमुद्रापार जाऊन बसले आहेत. या घोटाळेबाजांना देशात आणून शिक्षा दिली पाहीजे असं मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केलंय.विदेशातील काळा पैसा देशात परत आणण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील असंही त्यांनी मोदी सरकारला ठणकावून सांगितलं आहे.




























































