
सतीश शिंदे, धर्माबाद
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात धर्माबाद इथल्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. बाभळी बंधारा आंदोलनप्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध 2010 साली गुन्हा नोंदविण्यात आला होता. हे प्रकरण आता धर्माबादमधील कनिष्ठ स्तर न्यायालयात पोहोचलं आहे. सुनावणीसाठी सतत गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने नायडूंविरोधात हे वॉरंट जारी केलं आहे.
महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या पाणीवाटपावरून महाराष्ट्र सरकार व आंध्रप्रदेश सरकारमध्ये वाद निर्माण झाला होता. धर्माबादमधील बाभळी बंधारा परिसरात जमावबंदीचा आदेश असतानाही चंद्राबाबू नायडू व त्यांच्या तेलुगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंधाऱ्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यासह तेलगू देसम पक्षाच्या 15 तत्कालीन आमदारांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती.





























































