
सामना ऑनलाईन, मुंबई
पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी 396 नवीन बालवाडय़ा सुरू करण्यात येणार आहेत. या बालवाडय़ा पालिका शाळांशी संलग्न करण्यात येणार आहेत. यामुळे आता पालिकेच्या बालवाडय़ांची संख्या 900 होणार असून पटसंख्या 27 हजार होणार आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रात सर्व भागांमध्ये पालिकेच्या शाळा आहेत, मात्र या शाळांच्या तुलनेत पालिकेच्या उपलब्ध बालवाडय़ांची संख्या कमी असल्याने मुले खासगी बालवाडय़ांकडे वळतात. परिणामी पालिका शाळांच्या प्रवेशावरही याचा परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर सध्याच्या 504 बालवाडय़ांव्यतिरिक्त तब्बल 396 बालवाडय़ा सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यानुसार 22 संस्थांना नुकतीच नेमणूक पत्रे देण्यात आली आहेत. प्रत्येकी 30 पट क्षमता असणाऱ्या या बालवाडय़ांमुळे महापालिकेच्या बालवाडय़ांची संख्या 900 एवढी होणार आहे. परिणामी महापालिकेच्या बालवाडय़ांची एकूण पट-क्षमता 27 हजार एवढी होणार आहे. या बालवाडय़ांमुळे विद्यार्थी गळती रोखण्यास मदत होणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) ए. एल. जऱ्हाड यांनी दिली.
133 बालवाडय़ा मराठी माध्यमाच्या
नव्याने सुरू होणाऱ्या 396 बालवाडय़ांमध्ये सर्वाधिक म्हणजे 133 बालवाडय़ा मराठी माध्यमाच्या आहेत. त्याखालोखाल 92 बालवाडय़ा उर्दू माध्यमाच्या, 87 बालवाडय़ा हिंदी माध्यमाच्या, 25 बालवाडय़ा गुजराती माध्यमाच्या, 23 बालवाडय़ा इंग्रजी माध्यमाच्या असणार आहेत. याखालोखाल कन्नड क तेलुगू भाषिक माध्यमांच्या प्रत्येकी 10 बालवाडय़ा; तर तामीळ माध्यमाच्या 9 बालवाडय़ा असणार आहेत. याक्यतिरिक्त 6 बालवाड्या या ‘सेमी इंग्रजी’ माध्यमाच्या असणार असून 1 बालकाडी ही ‘मुंबई पब्लिक स्कूल’ अंतर्गत असणार आहे.
निसर्गचित्र, पशु-पक्षी, कार्टुन्स आणि खेळणी
पालिकेच्या आधी सुरू असलेल्या बालवाड्यांसह सर्व बालवाड्यांमध्ये चिमुकल्यांना आवडतील अशी रंगरंगोटी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये पशु-पक्षी, डोंगर-नदी, हिरवी झाडे, फळे-फुले, सूर्य-चंद्र-तारे यासारख्या निसर्गातील चित्ताकर्षक बाबींसोबतच लहानग्यांचे आवडते कार्टुन्सदेखील बालवाड्यांच्या भिंतीवर विराजमान होणार आहेत. याचसोबत मोठय़ा प्रमाणात आकर्षक खेळणीदेखील बालवाड्यांमध्ये मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

























































