आकर्षक कपडे घालते म्हणून तरुणीला मारून टाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, इंदूर

विकृत मानसिकता असलेल्या एका तरुणाने तरुणीचा खून केला आहे. कमलेश साहू असं या तरुणाचं नाव असून तो गेले अनेक दिवस सुप्रिया जैन या तरुणीच्या मागे हात धुवून लागला होता. सुप्रिया आकर्षक कपडे घालते, तरुणांसोबत गप्पा मारते, त्यांच्यासोबत वेळ घालवते हे न आवडल्याने कमलेशने तिच्यावर ३८ वेळा चाकून वार करत हत्या केली आहे. कमलेश आणि सुप्रिया एकाच शाळेत शिकले होते. शाळेपासून तो सुप्रियाच्या मागे लागला होता.

सतत नापास होणारा कमलेश वेटरचं काम करत होता. त्याने फेसबुकच्या आधारे सुप्रियाशी पुन्हा मैत्री केली. मैत्री होताच काही दिवसात त्याने सुप्रियाला लग्नासाठी मागणी घातली. सुप्रियाने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिल्याने कमलेश भडकला होता. कमलेशने फेसबुकच्याच आधारे सुप्रियाचा घरचा पत्ता शोधून काढला. कमलेश दिवसरात्र तोंडाला रुमाल बांधून तिचा पाठलाग करायला लागला. यावेळी सुप्रिया ज्या पद्धतीने वागते ते त्याला न आवडल्याने तिचा खून करायचं कमलेशने ठरवलं होतं.

शुक्रवारी रात्री सुप्रियाला तिच्या एका सहकाऱ्याने घराजवळ सोडलं. तो गेल्यानंतर कमलेश सुप्रियाच्या मागून आला आणि त्याने तिच्या तोंडावर, मानेवर, गळ्यावर आणि पाठीवर असे ३८ वार केले. तिथल्या दोन तरुणांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने चाकूचा धाक दाखवून त्यांना पळवून लावलं. या तरुणांनी आरडाओरडा करत गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला. गस्तीवर असलेल्या पोलिसांची गाडी तिथून जात होती. या तरुणांचा आरडाओरडा ऐकून ते घटनास्थळी आले. पोलीस येईपर्यंत कमलेश सुप्रियावर वार करत होता. सुप्रियाला रुग्णालयात नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी कमलेशच्या केलेल्या चौकशीत तो विकृत असल्याचं कळालं आहे. सुप्रियाने फेसबुकवर जेव्हा त्याला नकार दिला होता तेव्हा त्याने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.