
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण शहरात गणेशोत्सव कालावधीत वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी वाहतुक नियोजनाचा ‘मास्टर प्लान’ आखला असून त्यानुसार पोलीस कर्मचारी व होमगार्ड वाहतुकीवर नियंत्रण ठेवत आहेत. वाहतुकी कोंडी तसेच शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षी मालवण बाजारपेठ मार्गावर होणारी वाहतूक कोंडी यावर्षी नियंत्रणात ठेवण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. पाच, सात आणि ११ दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जन मार्गावरही अधिक पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे, असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.
गणेशोत्सवात असलेली गणेशभक्तांची वर्दळ लक्षात घेता मालवण पोलिसांनी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी मेहनत घेतली आहे. पोलीस निरीक्षक चौधरी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, डॉ. बालाजी सवंडकर, रेश्मा मोमीन हे अधिकारी जीप पेट्रोलिंग करत आहेत. ११ ते २४ सप्टेंबर या कालवधीत शहरात वर्दळीच्या विविध ठिकाणी पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.
शहरात बाजारपेठ, भरड नाका, तारकर्ली नाका, देऊळवाडा, एसटी बसस्थानक, सकपाळ नाका, गावकर नाका, गायमुख नाका, दैवज्ञ भवन, फोवकांडा पिंपळ, स्वामी हॉटेल, कोळंब आदी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात आहेत. एसटी प्रशासनाने बाजारपेठ मार्गावर अरुंद रस्त्यांमुळे एसटी सेवा २५ सप्टेंबर पर्यंत बंद ठेवली आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.































































