
सामना प्रतिनिधी । नांदेड
नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय उडविणार असल्याचा खोटी धमकी देणार्या बनावट वकिलाविरुध्द दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद वजिराबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर वजिराबाद पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याची परवानगी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे मागितली आहे. प्राप्त माहितीनुसार मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणाचा पुढे तपास करण्याची परवानगी वजिराबाद पोलिसांना दिली आहे.
नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस हवालदार रामदयालसिंह पंकजसिंह ठाकूर यांनी नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस आयुक्त नागपूर कार्यालयातील विशेष शाखेने ९ जुलै रोजी दिलेले पत्र दहशतवाद विरोधी पथक नागपूरकडे पाठविले. ते पत्र दहशतवाद विरोधी पथक नागपूरने नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे पाठविले. त्या अर्जात अर्जदाराचे नाव नव्हते. त्यात असे लिहिलेले आहे की, शेख शादुल शेख रसूल रा.गल्ली नंबर २, पानदान रोड, बरखत कॉम्पलेक्स, देगलूर नाका हा माणूस नागपूर येथे गेला होता. त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय जे नागपूरच्या महाल भागात स्थित आहे. त्याची चित्रफित काढून आणली आहे. आणि ते कार्यालय उडवून देण्यासाठी तो वारंवार नांदेड ते नागपूर असा प्रवास करीत आहे.
कोल्हापूर येथील स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाने या व्यक्तीला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातून ताब्यात घेतले होते, पण त्यावर कोणतीच कारवाई न करता त्याला सोडून दिले. हा अर्ज नांदेडला आल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी गणेश कराड, क्षीरसागर, मस्के आणि उबाळे यांनी शेख शादुल शेख रसूलची चौकशी केली. दहशतवाद विरोधी पथकाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेख शादुल शेख रसूल हा यापूर्वी कधीच नागपूर किंवा कोल्हापूर येथे गेलेला नाही. शेख शादुल शेख रसूलने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतीच्या नुकसानीसंदर्भाने नुकसान भरपाई मिळवून देतो म्हणून शोएब अहेमद सिद्दीकी जहिरोद्दीन सिद्दीकी रा.मदिनानगर देगलूर नाका याने आपण स्वतः वकिल असल्याची बतावणी करुन त्याच्या वडिलांची दिशाभूल केली आणि त्यांच्याकडून १७ ते १८ लाख रुपये उकळले. शोएब अहमद सिद्दीकी हा बनावट वकील असल्याची माहिती शेख शादुल शेख रसूल यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पैसे परतीचा तगादा लावला. तेव्हा शोएब अहेमद सिद्दीकेने असा निनावी अर्ज नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे पाठविला.
रामदयालसिंह ठाकूरच्या अर्जावरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात शोएब अहेमद सिद्दीकी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वजिराबाद पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याची परवानगी नांदेडच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे मागितली असून, ती त्यांना मिळाली आहे.































































