गणराया, दोघांनाही सुबुद्धी दे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

गणरायाला मी अनेक साकडं घातली. त्यातलं एक होतं रवी शास्त्री आणि विराट कोहलीला बुद्धी दे!

गणरायांनी माझं साकडं मनावर घेतलं की नाही ते लवकरच कळेल. त्याच्याकडे माझी राजकीय यादीसुद्धा मोठी आहे.

रवी शास्त्री हा बुद्धिमान माणूस आहे. हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. विराट कोहलीच्या बाबतीत माझा वैयक्तिक अनुभव शून्य आहे. त्यामुळे रवीच्या बाबतीत मला आश्चर्य वाटतं. जो माणूस फक्त दोन फटके, फारसा न वळणारा डावखुरा स्पिन. या जोरावर स्वतःच क्रिकेट, कॉमेंट्री आणि कोचिंगमध्ये एवढ्या वर पोहोचतो, तो बुद्धिमान असायलाच हवा. मग बुद्धी भ्रष्ट होते किंवा अति अभिमान दुराभिमान होतो? नाहीतर मालिका 4 विरुद्ध 1 ने हरल्यावर ‘जित्तम मया’च्या स्टाइलमध्ये कोण बोलेल? फक्त कदाचित अमित शहा! त्यामुळे आपल्यालाच प्रश्न पडतो, खरंच आपण जिंकलो की हरलो? मी इंग्लंडला पाहिलं, ते स्वप्न की सत्य? एक गोष्ट खरीय की आकडेवारी दाखवते तेवढा हा पराभव एकतर्फी नव्हता. एजबॅस्टन आणि साऊथम्प्टनला विजयाची संधी चालून नाही तर धावत आपल्याकडे आली होती. आपलं खराब क्षेत्ररक्षण कणाहीन फलंदाजी, अपरिपक्व नेतृत्वाचे वगैरे अडथळे आपणच तिच्या मार्गात उभे केले. त्यामुळे आपण त्यासाठी फक्त हळहळ व्यक्त करू शकतो. उन्माद नाही.

आमचा संघ गेल्या पंधरा वर्षांतल्या कुठल्याही हिंदुस्थानी संघापेक्षा उजवा आहे, असं हे दोघे कुठल्या पराक्रमाच्या जोरावर सांगतात? मुळात ज्या इंग्लंडने आपल्याला हरवलं, त्यांची फलंदाजी कमकुवत होती. इंग्लिश फलंदाजांना स्विंग आणि सीम विरुद्ध कसं खेळावं याची शिकवणी ठेवायची गरज होती. इंग्लिश माध्यमात शिकणार्‍या मुलाला इंग्लिशसाठी शिकवणी ठेवण्यासारखा हा प्रकार आहे. या मोसमात ओव्हल कसोटीपर्यंत दोन्ही संघांतल्या फलंदाजांनी मिळून प्रत्येक विकटेमागे फक्त 24.5 धावा केल्या. अठरा वर्षांतला हा इंग्लंडमधला नीचांक आहे. यावरून गोलंदाजांनी किती दादागिरी केली ते कळेल. आणि त्याचबरोबर फलंदाजांनी किती नांगी टाकली ते! हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली त्याचं ते फळ आहे, पण फिरकी गोलंदाजी आणि फलंदाजीचं काय? सेहवाग, द्रविड, सचिन, गांगुली, लक्ष्मणपेक्षा या संघाची फलंदाजी सरस होती?

2002, 2007 मध्ये हिंदुस्थानी संघाने इंग्लंडमध्ये कसोटीत उत्कृष्ट कामगिरी केली. तेव्हाही चेंडू आजच्या सारखेच स्विंग होत होते. अंमळ जास्त असतील! या संघातला फक्त विराट कोहली, त्या संघात फलंदाज म्हणून बसला असता. कुंबळे असताना अश्विन इंग्लंडमध्ये फक्त स्वतःच्या स्वप्नातच खेळू शकला असता. मात्र त्या संघाला या संघाची वेगवान गोलंदाजी मिळायला हवी होती, असं वाटत राहातं. त्यात मी झहीर खानला बसवेन. कर्णधार म्हणून सौरभ गांगुली हा विराट कोहलीपेक्षा काही प्रकाश वर्ष पुढे आहे आणि हे सर्व रवी शास्त्रीने कॉमेंट्रेटर म्हणून पाहिलेलं आहे. पण प्रशिक्षकाचे कपडे चढवल्याबरोबर त्याने डोळ्यावरचा गॉगल बदलला. त्याला भूतकाळ धूसर दिसला आणि वर्तमान प्रकाशमय. औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांनी आणि सिकंदराच्या दरबारात पोरस राजाने हरल्यावरही बाणेदारपणा दाखवला त्याचं आजही कौतुक होते. रवी शास्त्री विराट कोहलीने दाखवला त्याला सामान्यपणे बालिशपणा म्हटलं जातं म्हणून मी म्हणतो गणराया दोघांनाही सुबुद्धी दे!