विषारी गवत खाल्ल्याने 26 मेंढ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सटाणा

बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील जगन्नाथ त्र्यंबक गवळी यांच्या 26 मेंढ्यांनी विषारी गवत खाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे गवळी यांचे सुमारे 3 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले असून तलाठी यांनी पंचनामा करण्यासाठी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज रविवारी सकाळी येथील तहसील कार्यालयावर हल्लाबोल केला. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

माजी आमदार संजय चव्हाण, जि.प.सदस्या लता बच्छाव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, मनसेचे पंकज सोनवणे यांच्यासह तहसीलदार प्रदीप हिले, गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी सबंधित शेतकऱ्यास पंचनामा करून तात्काळ मदत देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. सकाळी 9 वा. येथील तहसील कार्यालयात अजमीर सौंदाणे येथील ग्रामस्थ प्रकाश मगर, रमेश नंदाळे, जितेंद्र पवार, मंगेश पवार, धंनजय पवार, गुलाब पवार, शिवाजी पवार, आदींसह शेकडो संतप्त ग्रामस्थ मृत झालेल्या 26 मेंढ्या ट्रॅक्टरवर टाकून तहसील आवारात घेऊन आले. यामुळे पोलीस प्रशासनदेखील हादरले.

तहसीलदार प्रदीप हिले, गटविकास अधिकारी महेश पाटील, वैद्यकीय अधिकारी राकेश बढे यांनी तात्काळ तहसील आवारातच मृत मेंढ्यांचा पंचनामा करून संतप्त ग्रामस्थांना शांत केले. यानंतर सबंधित तलाठी गायकवाड यांचेवर कारवाई करण्याचे सूचित केले. यावेळी जि. प. सदस्य लता बच्छाव यांनी आपद्ग्रस्त जगन्नाथ गवळी यांना तात्काळ रोख रक्कम 25 हजार तर माजी आमदार संजय चव्हाण 21 हजार रुपये तातडीने मदत केली. यावेळी ग्रामस्थांनीदेखील लोकवर्गणी करून गवळी यांना मदतीचा आधार दिला आहे.

summary- 26 sheep died causing poison