
सामना प्रतिनिधी । मुंबई
सेंट झेव्हिअर्समधील मराठी वाङय मंडळातर्फे महाविद्यालयात वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. नाटय़, नृत्य, संगीत, साहित्य अशा विविध कलागुणांची छाप या कार्यक्रमाद्वारे उमटणार आहे. मंडळाचे हे 95 वे वर्षे असून ‘नाती’ या संकल्पनेवर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. महाविद्यालयात बुधवार, 19 सप्टेंबरला या कार्यक्रमाची सुरुवात होईल.
नाती ही संकल्पना विविध कलाकृतींच्या सहाय्याने व्यक्त करण्यात येणार आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपणी जी नाती मानतो, अशा हा नात्यांचा हा सोहळा आहे. मग ते नाते माणसाशी असो की एखाद्या वस्तू किंवा प्राण्याशी. यावेळी एक मजेशीर सिनेमा दाखवण्यात येईल. त्यात नाट्य, नृत्य, संगीताचा आविष्कार असेल. माणूस आणि प्लॅस्टिकच्या आगळ्यावेगळ्या नात्यावर आधारित एक नाटिका बघायला मिळेल. आई आणि तिच्या लेकराचे नात्यांची मेलडी तर सूर आणि ताल यांचे संगीतमय नाते वेगळ्या नाट्यातून पाहायला मिळेल. वसुंधरा आणि आकाश यांचे नाते तर सैनिक आणि मातृभूमी यांचे नाते सुंदर कथेद्वारे रेखाटले जाणार आहे.

























































