
सामना प्रतिनिधी, मुंबई
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात समविचारी पक्षांची महाआघाडी करण्याच्या दृष्टीने आज विरोधकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पण महाआघाडी करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम तयार करण्याच्या मागणीबरोबर लोकसभेच्या सात जागा स्वाभिमानी पक्षाला सोडण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केल्यामुळे महाआघाडीच्या चर्चेलाच या बैठकीत खीळ बसल्याचे सांगण्यात येते.
राज्यात समविचारी पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तुकाराम भस्मे उपस्थित होते. या बैठकीत राजू शेट्टी यांनी महाआघाडी करताना किमान समान कार्यक्रम तयार करण्याची मागणी केली. हा कार्यक्रम तयार झाल्याशिवाय महाआघाडी होऊ शकत नाही, अशी सूचना राजू शेट्टी यांनी केल्याचे कळते.
त्याशिवाय लोकसभेच्या 48 जागांपैकी सात जागा स्वाभिमानी पक्षासाठी सोडण्यात याव्यात, अशी मागणी शेट्टी यांनी केल्याचे कळते. कोल्हापूरमधील हातकणंगलेमधून ते मागच्या वेळी खासदार म्हणून निवडून आले. या जागेसोबत माढा, बारामती, नंदुरबार अशा आणखी सहा जागांची मागणी त्यांनी केली. यातील बऱ्याच जागा राष्ट्रवादीकडे आहेत. माढा तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा लोकसभा मतदारसंघ. पण सध्या राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील माढातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत. नंदुरबारही राष्ट्रवादीचा गड होता. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित भाजपात दाखल झाल्यानंतर त्यांच्या कन्या हिना गावित भाजपाच्या खासदार आहेत. मात्र ही जागा आपल्याकडे राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही प्रयत्नशील आहेत. अशा वेळी राजू शेट्टी यांनी केलेल्या मागणीमुळे या चर्चेचा नूरच पालटल्याचे सूत्रांनी सांगितले.
summary- opposition-alliance-meeting-interrupted



























































