श्री कपालेश्वर मंदिरावर आढळला प्राचीन शिलालेख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक 

 ‘की टू नाशिक-त्र्यंबक-1941-42’ या दुर्मिळ पुस्तकातील माहिती वाचून गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी श्री कपालेश्वर मंदिरावरील प्राचीन शिलालेखाचा शोध घेतला. तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर रविवारी मंदिराच्या कळसाजवळ दगडात कोरलेला शिलालेख आढळला.

नाशिक येथील प्रसिद्ध श्री कपालेश्वर मंदिराच्या कळसाजवळ प्राचीन शिवालेख आहे, असे ‘की टू नाशिक-त्र्यंबक-1941-42’ या पुस्तकात नमूद आहे. हे दुर्मिळ पुस्तक देवांग जानी यांच्या संग्रही आहे. जानी यांनी 14 सप्टेंबरपासून मित्र अतुल शेवाळे, अभिजीत गाडे यांच्या मदतीने शिलालेख शोधण्यास सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी मंदिराच्या छताचे वॉटर प्रूफींग केले गेले, त्यामुळे हा शिलालेख झाकला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तो स्वच्छ केला. हा शिलालेख दगडात कोरलेला असून, अडीच बाय अडीच फूट आकाराचा आहे. त्यावरील लिपी देवनागरी आहे. हा शिलालेख इ.स. 1200 मधील असावा, असा दावा त्यांनी केला आहे. त्यावरील मजकूर अस्पष्ट असल्याने वाचता येत नाही.

पुरातत्वकडे पाहणीची मागणी
देवांग जानी हे मंगळवारी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांची भेट घेवून त्यांना शिलालेखाची माहिती देणार आहेत. विभागाने त्याची पाहणी करावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.