
सामना प्रतिनिधी । इगतपुरी
इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागांना जोडणाऱ्या घोटी-सिन्नर महामार्गावर रस्त्याची पुरती वाट लागली आहे. रस्त्यांवर खड्डे की खड्डय़ांमध्ये रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या खराब रस्त्यांचा नाहक त्रास रुग्ण, पर्यटक, विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळे नवरात्रीपूर्वी तरी या महामार्गाची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा प्रत्येक खड्डय़ात घटस्थापना करू, असा इशारा स्थानिक महिलांच्या वतीने देण्यात आला आहे. तसे निवेदन तहसीलदार वंदना खरमाळे यांना देण्यात आले आहे.
घोटी-सिन्नर महामार्ग प्रचंड खड्डेमय झाला आहे. या रस्त्यांवरून प्रवास करणाऱया ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण, शेतकरी, पर्यटक, आदिवासी नागरिक यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा आणि रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अतिशय धोकादायक बनले आहे. सायकल आणि इतर सर्व वाहनचालकांना वाहन चालविताना मोठे दिव्य पार पाडावे लागत आहे. कोटय़वधींचा खर्च करूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
केवळ डागडुजी न करता आराखडा तयार करून घोटी-सिन्नर महामार्गाचे नवरात्रीपूर्वी मजबुतीकरण करावे अन्यथा आम्ही महामार्गावरील प्रत्येक खड्डय़ात घटस्थापना करणार आहोत. घटस्थापना केल्यानंतर या महामार्गावरून आम्ही कोणतेही वाहन जाऊ देणार नाही. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास त्यास बांधकाम विभागाला जबाबदार धरण्यात यावे. तरी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून घोटी-सिन्नर महामार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या नाशिक कार्याध्यक्षा कांचन दिघे-सहाणे यांनी दिला. या वेळी उद्योजिका मनीषा देवगिरे, साकुरच्या सरपंच सविता सुनील सहाणे, बचत गटाच्या अध्यक्षा माधुरी भागीरथ भगत, उपाध्यक्षा रंजना भगत, सुमित्रा भगत, सुंदरा भगत, लताबाई चव्हाण, रुख्मिनी भगत, सरूबाई गटकळ, शैलाबाई भगत, सुमन कडु, विमल भगत, नंदा गटकळ, ताईबाई भगत, शिला भंडारी, चांगुणा भगत आदी महिला उपस्थित होत्या.
























































