
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे आज मंगळवारी सकाळी संभाजीनगर येथे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. राज्याचे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झालेल्या चिपळूणकर यांनी राष्ट्रीय शिक्षण नियोजन प्रशासन संस्थेचे सल्लागार म्हणूनही अनेक वर्ष काम केलं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी संभाजीनगर इथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
विद्याधर विष्णु उपाख्य वि. वि. चिपळूणकर यांचा जन्म 13 एप्रिल 1929 रोजी विर्ले पार्ले, मुंबई येथे झाला. त्यांनी 1976 ते 1986 या 10 वर्षांच्या कालावधीत राज्याचे शिक्षणसंचालक म्हणून काम पाहिले होते. गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले होते. वि. वि. चिपळूणकर यांनी माध्यमिक शिक्षक, शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षणसंचालक अशा विविध पदांवर काम केले होते. तसेच ते बालभारतीचे माजी संचालक पण होते. बालभारतीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. सेवानिवृत्तीनंतर ते संभाजीनगरला स्थायिक झाले. आज ‘चिपळूणकर समिती’च्या अहवालामुळे ते अनेकांना माहीत आहेत. त्यांच्या इतर अनेक योजना आणि त्यांनी केलेली अनेक कामे आजही गौरवाने सांगितली जातात.
माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे यांनी सांगितले, की ग्रामिण भागातील बुद्धीमान विद्यार्थ्यांसाठी त्यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या पाठिंब्याने शासकीय विद्यानिकेतनांची संकल्पना साकारली. “उद्धरावा स्वये आत्मा” हे विद्यानिकेतनांचे ब्रीदवाक्य त्यांनीच सुचवले होते. मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तर सुधीर जोशी शिक्षणमंत्री होते. त्यावेळी, रात्र शाळांचे निकाल कमी लागतात, म्हणून त्या बंद कराव्यात, अशी शिक्षण क्षेत्रातील अनेकांची सूचना होती.
























































