
सामना ऑनलाईन, पणजी
सध्या सरकार अस्तित्वात असून नसल्यासारखे आहे. सरकारमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्या. त्यासाठी एक दिवसाचे अधिवेशन बोलवा. आम्ही त्यात बहुमत सिद्ध करून दाखवू, अशी भूमिका काँग्रेसच्या 15 आमदारांनी आज सायंकाळी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन मांडली.
सरकार अस्थिर असून प्रशासन ठप्प झाले असल्याने भाजपने विधानसभा विसर्जित करण्याचा किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केल्यास तो मान्य करू नये. भाजपला सरकार चालवता येत नसेल तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्या. आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करून दाखवू, असे काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना सांगण्यात आले.
काँग्रेसने 21 आमदारांची नावे जाहीर करावीत- भाजप
दरम्यान, काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी किती आमदार आहेत त्यांची नावे जाहीर करावीत. केवळ पोकळ दावे करून जनतेची दिशाभूल करू नये, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी व्यक्त केली आहे. भाजप आघाडी अभेद्य असून काँग्रेसने आघाडी मधून फुटून कोणी काँग्रेसला सरकार बनवण्यास मदत करतील याची स्वप्नेसुद्धा बघू नये असा सल्ला नाईक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिला आहे




























































