
सामना प्रतिनिधी, मुंबई
गुरुवारी मोहरमनिमित्त बंद असलेला मुंबई शेअर बाजार आज आठवडाअखेर चांगली मजल मारेल अशी आशा असतानाच दुपारच्या सत्रात सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला आणि गुंतवणूकदारांना घाम फुटला. दलाल स्ट्रीटवर भूकंप झाला. निफ्टीनेही 350 अंकांची कोलांटउडी मारली.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 172 अंकांनी वाढल्याने चांगली सुरुवात झाली. मात्र दुपारी 12 नंतर हे चित्र साफ बदलले. सेन्सेक्स तब्बल 1100 अंकांनी कोसळत 35 हजार 993.64 अंकांवर पोहोचला तर निफ्टी 11 हजार अंकांच्या खाली गेला. दिवसाअखेर सेन्सेक्स 279 अंकांनी सावरत 36 हजार 841.60 अंकांवर बंद झाला तर 11 हजारांखाली पोहोचलेला निफ्टी 11 हजार 143.10 अंकांवर पोहोचला.
आजच्या पडझडीत बँकिंग क्षेत्रातील समभागांना मोठा फटका बसला. यात येस बँकेचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांची आरबीआयने हकालपट्टी केल्यामुळे येस बँकेच्या समभागात मोठी घसरण झाली.
दलाल स्ट्रीटवर 5 लाख 66 हजार 187 कोटींचा चुराडा
दलाल स्ट्रीटवर गेल्या पाच दिवसांत तब्बल पाच लाख 66 हजार 187 कोटी रुपयांचा चुराडा झाला. सोमवारपासून सेन्सेक्स हेलकावेच खात होता. या पाच दिवसांत तो 1249 अंकांनी म्हणजेच 3.28 टक्क्यांनी घसरला. आज तर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटल तब्बल दोन लाख दोन हजार 433 कोटी रुपयांनी घसरले.
summary- sensex fall down by 1500























































