VIDEO: सेवाग्राममध्ये बनतोय जगातील सर्वात उंच चरखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वर्धा 

वर्ध्यातील सेवाग्राममध्ये जगातील सर्वात उंच चरखा बनवला जात आहे. या चरख्याची लांबी 31 फुट असून उंची साडे अठरा फुट आहे. त्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या चरख्याची नोंद होणार आहे. विशेष म्हणजे या चरख्याचा रंग दिनविशेषानुसार बदलला जाणार आहे. त्यामुळे वर्ध्याची एक नवी ओळख निर्माण होणार असून पर्यटकांसाठी हा चऱखा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त 2 ऑक्टोबर रोजी वर्ध्याच्या सेवाग्राम येथे जगातील सर्वात उंच चरखा उभारला जाणार आहे. या चरख्याची निर्मिती मुंबई येथील जे.जे. स्कुल ऑफ आर्टचे प्रध्यापक आणि विद्यार्थी करत आहेत. सध्या देशात दोन मोठे चरखे असून त्यातील एक चरखा दिल्ली विमानतळावर आहे. तर दुसरा दिल्लीतील कनॉट प्लेस येथे असून दोघांचीही उंची 11 फुट आहे. मात्र सोवाग्राम मधील चरखा हा जगातील सर्वात मोठा चरखा असून त्याची लांबी 31 फुट असून उंची साडे अठरा फुट आहे. त्यामुळे याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली जाणार आहे.

सेवाग्राम विकास आराखडा प्रकल्पआंतर्गत सेवाग्राम, पवनार येथे अनेक विकास कामे केली जात आहेत. त्याअंतर्गत सेवाग्राम मार्गावर उभारण्यात येत असलेल्या कम्युनिटी सभागृहाच्या प्रांगणात हा जगातला सर्वात मोठा चरखा उभारला जाणार आहे. या चरख्याला 16 पाते आहेत व त्याच्या प्रत्येक पात्यावर गांधीजींचे संदेश लिहिलेले असतील. या चरख्याचा रंग दिनविशेषानुसार बदलला जाणार आहे. म्हणजे जागतीक पर्यावरण दिवसानिमित्त चरख्याचा रंग हिरवा असेल. तर 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला चरखा तिरंगी असेल. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या चरख्याच्या निमित्ताने वर्धा आणि सोवाग्रामच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.