
सामना प्रतिनिधी। देवगड
सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड, कणकवली व सावंतवाडी तालुक्यातील घरफोडींमागे मध्य प्रदेशातील ‘झाबोआ भिल्ल टोळी’चा हात असल्याचे समोर आले आहे. या टोळक्याच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. तेजराम नानूराम प्रजापती (३५) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून रक्कम, दागिने व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे.
आरोपीने सिंधुदुर्ग येथे २० घरफोडया व रत्नागिरी जिल्ह्यात १४ घरफोडय़ा केल्याची कबुली दिली आहे. या टोळीत मध्य प्रदेश येथील अन्य चौघांचा समावेश असून त्यांची नावेही उघड झाली आहेत. त्यांनाही लवकरच अटक करू अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी दिली.
घरफोडी प्रकरणातील प्रमुख आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या दालनात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निमित गोयल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम म्हणाले, मागील काही महिन्यांमध्ये सावंतवाडी, कणकवली व देवगड तालुक्यात चोरट्यांनी बंगले फोडून त्यातून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्यानुसार एक विशेष पथक तयार करून रेकॉर्डवरिल गुन्हेगार, तसेच अशाच प्रकारचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार व इतर राज्यातील रेकॉर्ड वरील आरोपींची चौकशी करण्यात आली होती. तसेच चोरीतील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून व प्राप्त गोपनीय माहिती नुसार घरफोडी प्रकरणातील प्रमुख सूत्रधार मध्य प्रदेश राज्यात असल्याचे समजले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक मध्य प्रदेश राज्यातील कुक्षी जिल्हा धार येथे पोचले. त्यावेळी पाऊस पडत होता. संशयित आरोपीचे घर घनदाट जंगलात व डोंगराळ भागात होते. त्यामुळे तेथे पोचणे जवळपास अशक्य होते.
आरोपी हा आठवडी बाजारात येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार सापळा रचून प्रमुख आरोपी प्रजापती याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून साडेसात हजार रुपये , सोन्याचे दागिने व (एम.पी – ०४ सीई- १९०६ कार ताब्यात घेण्यात आली. आरोपी हा भिल्ल समाजातील असून आणखीन चार जणांचा यात समावेश आहे असेही गेडाम यांनी सांगितले.




























































