
सामना ऑनलाईन, मुंबई
देशातील विविध बँकांकडून घेतलेले कोटय़वधी रुपयांचे कर्ज फेडण्याचे मी गेली 2-3 वर्षें सातत्याने प्रयत्न केले. हे कर्ज फेडता यावे यासाठी माझ्याकडून सातत्याने पुढाकार घेतला गेला. परंतु अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यामध्ये खोडा घालून प्रत्येकवेळी आपले प्रयत्न हाणून पाडले, असा पलटवार मद्यसम्राट विजय मल्ल्या याने आज मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात केला.
बँकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पळून गेलेल्या मल्ल्या याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याची मागणी करणारा अर्ज ईडीने न्यायालयात केला आहे. त्या अर्जावर उत्तर देण्याचे आदेश मल्ल्याला देण्यात आले होते. मल्ल्याच्या वतीने त्यांच्या वकिलांनी आज पीएमएलए न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती एम. एस. आझमी यांच्यासमोर आपले उत्तर दाखल करून प्रलंबित कर्जाला ‘ईडी’च जबाबदार असल्याचा आरोप केला.
फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या ईडीच्या मागणीचा मल्ल्या याने या उत्तरात जोरदार विरोध केला आहे. प्रत्यार्पणासाठी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत आपण लंडन येथील अधिकाऱयांशी सर्वतोपरी सहकार्य करीत असून मी स्वतःला तेथील कोर्टाच्या तसेच कोर्ट प्रक्रियेच्या स्वाधीन केले आहे. मी हिंदुस्थानात परतण्यास नकार दिल्याच्या जाणीवपूर्वक वावडय़ा उठविल्या जात आहेत. परंतु ते खरे नाही. कायद्याचे पालन करणारा मी एक प्रामाणिक हिंदुस्थानी नागरिक आहे आणि अशा नागरिकाला न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करू नये अशा कळकळीची विनंतीही मल्ल्याने न्यायालयास केली आहे.
प्रत्यार्पणाच्या निकालापर्यंत ‘ईडी’च्या अर्जाला स्थगिती देण्याची मागणी
आपल्या प्रत्यार्पण प्रक्रिये संदर्भात लंडन येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून या वरील निकाल 10 डिसेंबर रोजी देण्यात येणार आहे. त्यामुळे तोपर्यंत आपल्या विरुद्ध ईडीने दाखल केलेल्या अर्जावर कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये. तसेच आपल्या विरुद्ध मुंबईतील पीएमएल?? न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यालाही स्थगिती द्यावी अशी मागणी मल्ल्यातर्फे करण्यात आली. परंतु न्यायालयाने तुर्त तरी तसे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. मात्र पुढील सुनावणी येत्या 28 सप्टेंबर रोजी ठेवली.
गेल्या तीन वर्षांत आपण अनेक वेळा बँकांचे कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न केले. या प्रक्रियेत ते साध्य करण्याऐवजी ईडीने प्रत्येकवेळी आपले प्रयत्न उधळून लावले. ईडीला कर्जवसुलीपेक्षा आपली मालमत्ता जप्त करण्यात जास्त रस आहे, असा दावाही मल्ल्याने केला. ईडीचा हा प्रयत्न जनहित आणि देशहिताच्या विरुद्ध असल्याचेही मल्ल्याने आपल्या उत्तरात म्हटले आहे.
























































