पाक सुधारला नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानने दोन वर्षांपूर्वी पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून केलेला ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा एक ‘संदेश’ देण्यासाठीच होता, असे सांगतानाच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भविष्यातही ‘सर्जिकल स्ट्राइक’ केले जातील, असा सज्जड दम लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी आज पाकिस्तानला दिला. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.

सप्टेंबर 2016 मधील आधीच्या सर्जिकल स्ट्राईकपासून धडा घेऊन पाकिस्तानच्या वर्तनात बदल घडेल असे वाटले होते. पण कश्मीरमधील परिस्थिती पाकिस्तानी नेतृत्वाला सुधारू द्यायची नाही. तसेच कश्मीरच्या खोऱयात अशांतता माजवण्यासाठी ‘आयएसआय’ सतत कारवाया करत आहे, असे ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राइक’ हे शत्रूला आकस्मिक धक्का देण्याचे प्रभावी हत्यार आहे. तसे ते असलेच पाहिजे, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले.

हिंदुस्थानला घायाळ करण्याचा चंगच पाकिस्तानने बांधला आहे. त्यासाठी नाना कारवाया सुरू आहेत. कश्मीरमध्ये अशांतता, रक्तपात घडवला जात असून तरुणांना ‘दहशतवादी’ बनवले जात आहे, असे लष्करप्रमुखांनी सांगितले.

पाकिस्तानने दिलेल्या मैत्रीच्या प्रस्तावाला आमची कमजोरी समजू नका, असे सांगतानाच हिंदुस्थानच्या नेतृत्वाने अहंकाराचा त्याग करून शांततेसाठी चर्चा सुरू करावी, असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. ते पंजाब प्रांतातील सनदी अधिकाऱयांच्या संमेलनात बोलत होते.

पाकिस्तानला धमक्या कोणीही देऊ नयेत. कारण दुश्मनीचे कोणतेही कृत्य आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री ही दोन्ही देशांच्या हिताची आहे. त्यातून गरिबीवर मात करता येईल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.