
सामना ऑनलाईन । चंदिगड
पंजाबमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने निर्विवाद विजय मिळवून भाजपचा दारुण पराभव केला आहे. जिल्हा परिषदेच्या 335 जागांपैकी काँग्रेसने तब्बल 331 जागा जिंकून भाजपला दणका दिला आहे. भाजपला केवळ 2, शिरोमणी अकाली दलाला 18 जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पार्टीला एकही जागा मिळाली नाही. 10 वर्षांनंतर या निवडणुकीत प्रथमच भाजप-शिरोमणी-अकाली दल युतीची पिछेहाट झाली आहे.
150 पंचायत समित्यांमधील दोन हजार 899 उमेदवारांपैकी काँग्रेसचे दोन हजार 351 उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिरोमणी अकाली दल – 353, भाजप-63, आप-20, भाकप-1, माकप-2, शिरोमणी अकाली दल (अमृतसर)-2 आणि इतरांना 107 जागा मिळाल्या आहेत.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या विजयाचे स्वागत केले आहे. जनतेने पुन्हा काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे. तसेच शासकीय यंत्रणा वापरल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळला आहे. ज्याचा पराभव होतो तो काय बोलणार! आम्ही लोकप्रियता गमावून बसलो असे ते म्हणणार नाहीत, असेही अमिंदर सिंग यांनी म्हटले आहे.
धाकधपटशा दाखविला
शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून आणि विरोधकांना धाकधपटशा दाखवून काँग्रेसने ही निवडणूक जिंकली असा आरोप आपने केला आहे. शिरोमणी अकाली दलानेही असाच आरोप काँग्रेसवर केला आहे.
पंथीय राजकारण नाकारले
शिरोमणी अकाली दल आणि इतर विरोधी पक्षांचा झालेला पराभव म्हणजे जनतेने पंथीय राजकारण नाकारून विकास करणाऱया आणि धर्मनिरपेक्ष सरकारला पाठिंबा दिला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

























































