
सामना प्रतिनिधी । मुंबई
आंतरराष्ट्रीय पातळीवर हवाला रॅकेट चालविण्याबरोबर ड्रग्ज, सोन्याची स्मगलिंग करणाऱया मलबारी टोळीला मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने दणका दिला आहे. या टोळीच्या पाच तस्करांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून या कारवाईमुळे टोळीतील अन्य तस्करांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
गेल्याच आठवडय़ात अमली पदार्थविरोधी पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मलबारी टोळीच्या फुरखाना खातून शेख (27) या तरुणीला 23 लाख 25 हजार किमतीच्या ऍम्फेटामाईन या ड्रग्जसह रंगेहाथ पकडले होते. हा ड्रग्जचा साठा ती कतारला घेऊन निघाली होती. पण मुंबई सोडण्याआधीच तिच्या हातात बेडय़ा पडल्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, संतोष भालेकर, एपीआय उमेश सावंत, महिला एपीआय जयश्री आडे, अंमलदार आउकर, गवस, पेंढारकर, राणे, ठोंबरे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. फुरखानाच्या चौकशीत तिचे काही साथीदार मुसाफिरखाना परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तब्बसूम मोहम्मद आरिफ शेख (32), रशिद हसन फरास (30), अब्दुल रशीद मुल्ला (32) आणि मुस्तकिम मोहम्मद अली या चौघांना पकडले. हे पाचही आरोपी मलबारी टोळीचे सदस्य असून दोहा, कतार, यूएई, दुबईमध्ये ड्रग्ज, सोन्याची स्मगलिंग करण्याचे काम करतात असे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.
सुंदर तरुणींची मदत
ड्रग्ज, सोन्याची यशस्वी तस्करी व्हावी, आपला मुद्देमाल पकडला जाऊ नये यासाठी मलबारी टोळी सुंदर तरुणींना हाताशी घेतात. त्या तरुणींच्या मदतीने हवाला आणि स्मगलिंगचे काम चालते. केरळ परिसरात राहणारे हे स्मगलर मुंबईतील पायधुनी परिसरातील हॉटेल व लॉजचा आसरा घेतात. येथूनच त्यांचा कारभार चालतो असेही तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले.
एआययूच्या हाती काहीच नाही
यापूर्वी विमानतळावरील कस्टमच्या हवाई गुप्तरच विभागाच्या पथकाने मलबारी टोळीच्या एका तस्कराला पकडले होते. पण त्याला पकडूनही एआययूला पुढे आणखी कारवाई करता आली नव्हती. उलट मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने फुरखानाला विमानतळावर पकडल्यानंतर तिच्या आणखी चौघा साथीदारांच्या मुसक्या आवळून मलबारी टोळीला दणका दिला आहे.
























































