
सामना ऑनलाईन, बीड
बीड जिल्ह्यातील माजलगांव परिसरात सहाय्यक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्यासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांनी केलेल्या कारवायांमुळे गुन्हेगार टरकले आहेत. माजलगाव परिसरात, बेधडक कारवाई, ना कोणाचा फोन, ना राजकीय हस्तक्षेप यामुळे आजपर्यंत कोणीही आळा घालू शकलं नव्हतं अशा गुन्हेगारांच्या नवटकेंनी मुसक्या आवळल्या आहेत.
माजलगाव, वडवणी हा भाग तसा सधन असला तरी इथे गुन्हेगारीचे प्रमाणही जास्त आहे. बेशिस्त वर्तन, दबावतंत्राचा वापर, राजकीय हस्तक्षेप यामुळे या परिसरात गुन्हेगार माजले होते. या गुंडांना, समाजकंटकांना आजपर्यंत कोणी वठणीवर आणू शकलं नव्हतं. गेल्या सहा महिन्यात भाग्यश्री नवटकेंनी या सगळ्या टोणग्यांना, गावगुंडांना सुतासारखा सरळ केलाय. वाळू माफिया तर हल्ली झोपेतही नवटकेंना घारबून दचकून उठायला लागलेत असं बोललं जातं.
नवटकेंनी कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाई सुरू केली, यामुळे ‘तो माझा माणूस आहे सोडा त्याला’ असा फोन करण्याचे धाडसही कोणाला होत नाहीये. मटका, चोरटी दारू, पत्त्याचे क्लबवाले गायब झालेत, अवैध वाहतूक बंद झाली आहे आणि याचं सगळं श्रेय भाग्यश्री नवटकेंना जात असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. भाग्यश्री नवटके एकट्या दोन अडीच शे गावावर करडी नजर ठेवत असतात. दिवसभर माजलगाव शहरात आणि रात्री दोन तालुक्यांच्या गस्तीवर त्या स्वत: असतात. अधिकारी चांगला असेल तर प्रशासनही चांगले असते असं पोलीस प्रशासनाबद्दल नेहमी बोललं जातं, नवटकेंनी ही गोष्ट खरी करून दाखवली आहे.



























































