भरघोस मिळणाऱ्या टोलमधून खड्डे का बुजवत नाही?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

शीव-पनवेल महामार्गावर टोल आकारणी करण्यात येत असूनही महामार्गावरील खड्डय़ांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. या खड्डय़ांमुळे झालेल्या अपघातात गेल्या काही वर्षांत अनेक बळी गेले आहेत. असे असतानाही सरकारचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असून खड्डय़ांचा त्रास वाहनचालकांना दररोज सोसावा लागत आहे. यावर हायकोर्टाने आज राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारला फैलावर घेतले. भरघोस मिळणाऱ्या टोलमधून खड्डे का बुजवत नाहीत, असा खरमरीत सवाल करीत कोर्टाने शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शीव-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात आज दीपक सिंग यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी गेल्या 30 महिन्यांत पनवेल विभागातील खड्डय़ांमुळे 341 जणांचा बळी गेला असून 2016 सालापासून शीव-पनवेल महामार्गावर 150 नागरिक मृत्युमुखी पडल्याचे याचिकाकर्त्याने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री तसेच संबंधितांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे याचिकाकर्त्याने खंडपीठाला सांगितले. त्यामुळे अंतरिम दिलासा मिळेपर्यंत या मार्गावरील टोल वसुली थांबविण्यात यावी तसेच खड्डय़ांमुळे होणाऱ्या अपघातांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडकोसह इतर प्रतिवाद्यांना उत्तर देण्याचे आदेश दिले.