साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक इतिहासजमा! आता सर्वसंमतीने निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशांत गौतम । संभाजीनगर

यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी याआधी घोषित झालेली अध्यक्षपद निवडणूक प्रक्रिया आता रद्द होणार आहे. सुचवलेल्या २० नावांतून अध्यक्षांची निवड महामंडळ सर्वसंमतीने करणार आहे, त्यामुळे यंदा बहुरंगी निवडणूक आणि त्यानिमित्ताने होणारी रणधुमाळीही रंगणार नाही. वादविवाद आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडणार नाहीत. साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात दिसत असलेले चित्र यापुढे वेगळे असणार आहे.

घटना दुरुस्तीनंतर साहित्य महामंडळाने अध्यक्षपद निवडणुकीची प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली परंपरा यंदाच्या वर्षापासून बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. नागपुरात चार-पाच महिन्यांपूर्वी या निर्णयाची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली. दरम्यानच्या काळात घटना दुरुस्तीची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण झाली. त्यामुळे ९३ व्या संमेलनापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. या प्रक्रियेस लागणारा वेळ लक्षात घेऊन पुढील वर्षापासून निर्णय लागू होईल, असे घोषितही झाले होते. पण साहित्य महामंडळ आणि घटक संस्थांनी उल्लेखनीय पुढाकार घेतला आहे.

साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठीचा सन्मान आजपर्यंत साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंत सारस्वतांना मिळाला आहे, असा इतिहास आहे. १९६४ साली महामंडळाचे पहिले अ.भा. मराठी साहित्य संमेलन हैदराबाद येथे ज्येष्ठ समीक्षक प्रा. वा.ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. याआधीची सर्व संमेलने विविध नावांनी भरली होती. १९६४ पासून यात सातत्य येऊ लागले. नंतरच्या काळात बिनविरोध निवडीचे दिवस आले. पुढील काळात अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया दुरंगी, तिरंगी, चौरंगी, पंचरंगी, सप्तरंगी होऊ लागली. लेखकाची लोकप्रियता महत्त्वाची की कसदार लेखन महत्त्वाचे याविषयी साहित्य क्षेत्रात चर्चा झडू लागल्या. उमेदवारांची संख्या वाढल्याने चुरस निर्माण होऊ लागली. साहित्य क्षेत्रात राजकारण आल्याने ही निवडणूक मनपा, न.प. ग्रामपंचायतीसारखी वाटू लागली. याच प्रकारामुळे साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज या निवडणुकीपासून चार हात दूर राहू लागले. या अध्यक्षपद निवडणूक प्रक्रियेत बदल करा, याविषयी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. ती आता थांबली आहे.

यांच्या नावांची चर्चा
कोसलाकार भालचंद्र नेमाडे, ना.धों. महानोर, महेश एलकुंचवार, अनिल अवचट, प्राचार्य रा.रं. बोराडे, डॉ. सुधीर रसाळ, सेवानिवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर, चंद्रकांत पाटील, रंगनाथ पठारे, श्याम मनोहर, अरुणा ढेरे, रावसाहेब कसबे, आशा बगे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सुचविल्यानुसार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीऐवजी निवड प्रक्रिया राबवावी, याबाबतची निर्णय प्रक्रिया पूर्ण झाली असून, यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रपरिषदेत केली. २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान यवतमाळ येथे होणाऱ्या बैठकीपासून अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रीयेला प्रारंभ होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. विलास देशपांडे उपस्थित होते.

अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत अनेक साहित्यिक सहभागी होण्यास इच्छूक नसत. त्यांना हे पद मिळायचेच असेल तर सन्मानाने मिळावे, अशी अपेक्षा होती. त्या अनुषंगाने निवडणुकीऐवजी निवड प्रक्रिया राबवावी, असा खल अनेक वर्षे महामंडळात सुरू होता. तोच विचार पुढे रेटत अखेर घटनादुरुस्तीने ही निवड प्रक्रिया प्राप्त झाली असून, यासाठी महामंडळाच्या चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन अशा एवूâण १२, समाविष्ट संस्थांकडून प्रत्येक एक असे पाच, संलग्न संस्थेकडून एक, निमंत्रक संस्थेकडून एक आणि विद्यमान अध्यक्षाकडून एक अशी एकूण २० नावे सुचवली जातील. महामंडळ या २० नावांमधून अध्यक्षाची निवड करेल, अशी माहिती डॉ. जोशी यांनी यावेळी दिली.