गोवा बनावटीच्या अवैध दारूवाहतूक प्रकरणी एकजण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापुर विभागीय आणि जिल्ह्याच्या भरारी पथकाने आज सकाळी ६ वा. मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी येथील वडगणेश मंदिरजवळ थरारक पाठलाग करत केलेल्या कारवाईत ३ लाख ८८ हजार २०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह एकूण १५ लाख ८८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी संतोष पांडुरंग देऊलकर रा. बिबवणे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई गोवा महामार्गवरून २७ सप्टेंबर रोजी पहाटे अवैधरित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी यांनी संबधित दारू वाहतूकिवर करडी नजर ठेवून कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापुर विभागीय भरारी पथक आणि सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला दिले होते. त्यानुसार या दोन्ही भरारी पथकांनी २७ सप्टेंबर रोजी पहाटे मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी सापळा रचला होता.

सकाळी ६ वाजता झाराप येथे गोव्याच्या दिशेहून येणाऱ्या टोयाटो कंपनीच्या इनोव्हा (एमएच ०३ बीएस ३१९८) या कारला तापासनीसाठी या भरारी पथकामार्फत थांबण्याचा ईशारा करण्यात आला. मात्र वाहन चालकाने गाडी न थांबविता वेगाने पुढे घेवून गेला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने या इनोव्हा कारचा थरारक पाठलाग करत ही कार पिंगुळी येथील वडगणेश मंदिराजवळ अडवून या वाहनाची तपासणी केली असता वाहनात ७५० व १८० मिली मापचे गोवा बनावटीची दारू असलेले ८० बॉक्स एकावरएक असे रचलेल्या स्थितीत आढळून आहे. या अवैध दारुची किंमत सुमारे ३ लाख ८८ हजार २०० रूपये एवढी आहे. त्यामुळे या अवैध दारू सह दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १२ लाखाची इनोव्हा कार असा मिळून एकूण १५ लाख ८८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जोप्त करण्यात आला आहे. तर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (क),(ड) व १०८ अन्वये बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची वाहतूक करणाऱ्या संतोष पांडुरंग देऊलकर रा. बिबवणे ता. कुडाळ याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भरारी पथकातील निरीक्षक संजय साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, दुय्यम निरीक्षक यु एस थोरात, डी एम वायदंडे, मोहन पाटिल, दिलीप दांगट, दीपक कापसे व अन्य कर्मचारी वर्गाने केली असून अधिक तपास जितेंद्र पवार करत आहेत.