
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
कोणत्याही राज्याची विधानसभा कार्यकाल संपण्याआधीच विसर्जित करण्यात आली तर त्या क्षणापासून तिथे निवडणूक आचारसंहिता लागू होईल आणि ती नवे सरकार स्थापन होईपर्यंत अमलात राहील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केले.
आजवर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच कुठल्याही राज्यात निवडणूक आचारसंहिता अमलात येत असे, पण केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यात बदल करणारा नवा मोठा निर्णय घेतला आहे. आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या भाग-8 नुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्याची विधानसभा विसर्जित होताच तिथे निवडणूक आचारसंहिता करण्याच्या नव्या निर्णयाबाबत कॅबिनेट सचिव आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवांना निवडणूक आयोगाने पत्रे पाठवली आहेत.
तेलंगणाला ताकीद
आजच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने लगेचच विधानसभा विसर्जित केलेल्या तेलंगणाच्या मुख्य सचिवांना पत्र धाडले आहे. जनतेला प्रभावित करणारे धोरणात्मक निर्णय घेतले जाता कामा नयेत, असे त्या पत्राद्वारे बजावण्यात आले आहे. तेलंगणात विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्यापि जाहीर झालेल्या नाहीत.
धोरणात्मक निर्णय घेण्यास मुख्यमंत्र्यांना मज्जाव
लोकसभा व विधानसभा विसर्जित झाल्यानंतर ताबडतोब आचारसंहिता अमलात आणण्याच्या निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयामुळे काळजीवाहू पंतप्रधान वा मुख्यमंत्र्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय आता घेता येणार नाहीत. आजवर निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच आचारसंहिता लागू व्हायची. दरम्यानच्या काळात मतदारांना प्रभावित करणारे धोरणात्मक निर्णय घेण्याची संधी सत्ताधारी पक्षाला म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना मिळायची. निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयामुळे त्याला चाप बसला आहे.

























































