
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
केरळ येथील प्रसिद्ध शबरीमाला मंदिराचे दरवाजे खुले झाले आहेत. 10 ते 50 वयोगटातील महिलांना असलेली प्रवेशबंदीची 800 वर्षांची प्रथा उठविण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे हे घटनाबाहय़ आहे. सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेशाचा हक्क आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.शबरीमाला मंदिरात मासिकपाळी सुरू झालेल्या तरुणींना आणि महिलांना प्रवेशास बंदी आहे. 800 वर्षांपासूनची ही परंपरा आहे.याविरुद्ध यंग लॉयर्स असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर अनेकदा सुनावणी झाली. आज पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने बहुमताने 4 विरुद्ध 1 असा निर्णय दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्या. आर.एफ. नरीमन आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी मंदिर प्रवेशबंदी अवैध असल्याचा निर्णय दिला, तर न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी शबरीमाला मंदिराच्या बाजूने निर्णय दिला.
पुनर्विचार याचिका दाखल करणार!
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे केरळमध्ये संमिश्र पडसाद उमटले. ‘अय्यप्पा धर्म सेने’चे राहुल ईश्वर यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करून पुनर्विचार याचिका दाखल करणार असे म्हटले आहे.
शबरीमाला मंदिर आणि परंपरा
केरळमध्ये पत्थनथिट्टा जिल्हय़ात डोंगरावर अय्यप्पा स्वामींचे शबरीमाला मंदिर आहे. हा देव ब्रह्मचारी आहे. केरळसह दक्षिण हिंदुस्थानातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर वर्षातून चार महिनेच खुले असते. पम्पा नदीकिनाऱ्यापासून पाच कि.मी. चालत मंदिरात दर्शनासाठी पुरुष भाविक जातात. या मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेशास बंदी आहे. मासिकपाळीच्या काळात पावित्र्य जपले जात नाही म्हणून बंदी असल्याचे मंदिर समितीचे म्हणणे आहे.
न्यायालयाने काय म्हटले
मंदिरात प्रवेश नाकारणे हा लिंगभेद आहे. हिंदू महिलांना असलेल्या पूजेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे महिलांबाबत दुजाभाव करून त्यांच्या आत्मसन्मानाला कमी लेखणे योग्य नाही असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केले. मासिकपाळी सुरू झालेल्या 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश नाकारणे ही धार्मिक परंपरा ग्राहय़ धरता येणार नाही. महिलांना मंदिर प्रवेशबंदी करणे यामागे मानसिकता आहे असे सरन्यायाधीश म्हणाले.
महिलांना पूजेचा समान अधिकार आहे. महिलांना कोणत्याही पातळीवर कमी लेखणे संविधानविरोधी आहे असे मत न्यायमूर्ती नरीमन यांनी मांडले.
संविधानातील अनुच्छेद 25 नुसार सर्वजण समान आहेत. मासिकपाळीच्या नावाखाली महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे योग्य नाही. महिलांना कमकुवत समजून ही बंदी घालण्यात आली होती, असे मत न्या. चंद्रचूड यांनी व्यक्त केले.
धार्मिक परंपरांमध्ये कोर्टाने हस्तक्षेप करू नये
पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठातील एकमेव महिला न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी मात्र शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीस पाठिंबा दिला आहे. एखाद्या धार्मिक प्रथा-परंपरेवर विश्वास असेल तर त्याचा सन्मान केलाच पाहिजे. धार्मिक परंपरांमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करू नये. देशात धर्मनिरपेक्ष वातावरण कायम राहण्यासाठी हे आवश्यक आहे अशा स्पष्ट शब्दांत न्या. मल्होत्रा यांनी सुनावले. समानतेच्या अधिकाराला धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारासोबत पाहिले पाहिजे. आजच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम होतील. हा मुद्दा केवळ शबरीमाला मंदिरापुरता मर्यादित नाही. इतर धार्मिक स्थळांपर्यंत हा मुद्दा जाईल. प्रथा रद्द करणे हे कोर्टाचे काम नाही, असे न्या. मल्होत्रा यांनी ठामपणे सांगितले.






























































