घरे, दुकाने फोडणारी तेलंगनामधील टोळी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाने ओरोस फाटा येथे शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत महाराष्ट्र, तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यात दुकाने व घर फोडी करून उच्छाद माजविणाऱ्या तेलंगणामधील टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात सुरेश नायक नारायण रेक्युला (४६) रा. बल्लारी- कर्नाटक, शंकर अप्पाराव सिम्मा (४३) रा. ऐसी गार्डन कोंडवारी- आंध्रप्रदेश, रवि सुबाराव रेगुला उर्फ़ लंबू रवि (५२) रा. संतेबिंदनूर- आंध्रप्रदेश, मंजुनाथ रविकुमार कुरबा (४५) रा. शिमोगा- कर्नाटक या चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेंडाम यांनी दिली.

जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी शुक्रवार रात्री ११:५० च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर कसाल ते ओरोस फाटा अशी गस्त घालत होते. यावेळी या पोलिसांना ओरोस फाटा येथील बाजारपेठेतील दुकानांच्या बाजूला चार लोक संशयास्पद वावरत असताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्या चारही संशयितांची विचारपूस केली. यावेळी संबंधिताकडून देण्यात आलेली नावे व गावांची माहिती संशयास्पद वाटल्याने त्यांच्या जवळील सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे दोन स्क्रू ड्रायव्हर, दोन कटावणी असे साहित्य सापडले. चोरी साठी वापरण्यात येणारे साहित्य त्यांच्याकडे आढळून आल्याने सुरेश नायक नारायण रेक्युला (४६) रा. बल्लारी- कर्नाटक, शंकर अप्पाराव सिम्मा (४३) रा. ऐसी गार्डन कोंडवारी- आंध्रप्रदेश, रवि सुबाराव रेगुला उर्फ़ लंबू रवि (५२) रा. संतेबिंदनूर- आंध्रप्रदेश, मंजुनाथ रविकुमार कुरबा (४५) रा. शिमोगा- कर्नाटक या चारही संशयित आरोपींना पोलिसांनी जाग्यावरच ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना शनिवारी येथील न्यायालयात हजर केले असता मुख्यन्यायदंडाधिकारी वर्षारानी पत्रावळे यांनी चारही आरोपींना ४ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

जिल्हा पोलीस दलाने ओरोस फाटा येथे पकडलेल्या तेलंगना येथील आंतरराज्य टोळीतील या संशयितांनी २७ सप्टेंबर रोजी रात्री रत्नागिरी येथे तीन दुकानांचे शटर फोडून तेथे चोरी केली केल्याची कबूली दिली. तसेच यापूर्वी तेलंगना आणि कर्नाटक येथेही चोरी व घरफोड्या केल्याचे सांगितले. तसेच गेली दोन वर्षे हैदराबाद जेल मध्ये शिक्षा भोगल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली. अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.