अनर्थ टळला! नाहीतर 50 लाख लोकांचा गेला असता जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
delhi-police-logo

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काही मिनिटांत एकाच वेळी 50 लाख लोकांचा जीव जाईल, असे अत्यंत धोकादायक ‘फेंटालीन’ रसायन इंदूरमधील एका लॅबमधून पोलिसांनी जप्त केले आहे. युद्धात वापरलेले जाणारे अत्यंत घातक रसायन हिंदुस्थानात पहिल्यांदाच मिळाल्याने तपास यंत्रणाही चक्रावली आहे. या प्रकरणी पीएचडी असलेला लॅबचा मालक आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय आणि संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या टीमने संयुक्तपणे ही कारवाई केली.

उच्चशिक्षित अमेरिकनद्वेष्टा

ज्या लॅबमधून फेंटालीन जप्त करण्यात आले त्या लॅबचा मालक हा स्थानिक व्यापारी तर आहेच पण त्याचबरोबर तो उच्चशिक्षित पीएचडीधारक आहे. तो अमेरिकाद्वेष्टा असून त्याचा साथीदार हा मेक्सिकोचा नागरिक आहे. हिंदुस्थानमध्ये पहिल्यांदाच हे रसायन सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. हिंदुस्थानातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

युद्धात शस्त्र म्हणून वापर

वैद्यकीय क्षेत्रात त्वचेवरील डाग काढण्यासाठी इंजेक्शनमधून त्याचा उपचारासाठी वापर केला जातो. पण त्याचा युद्धात शस्त्र म्हणूनही वापर केला जात होता. हे रसायन ओल्या कपड्यावर टाकून बंदुकीच्या पुढच्या बाजूला लावले जात असे आणि मग बंदुकीचा वापर केला जात असे. याचा वापर चीन, रशिया आणि इस्रायलने केला आहे.

फेंटालीन बनवल्याचे गूढ कायम

हिंदुस्थानात फेंटालीन पहिल्यांदाच सापडले आहे. 4 एएनपीपी रसायनांच्या मदतीने फेंटालीन तयार केले जाते. मात्र, ही सगळी रसायने आणली कुठून आणि फेंटालीन कशासाठी बनवले गेले याचे कोडे तपास यंत्रणांना पडले आहे. या आधी एकदा चीनमधून तस्करी करून हे रसायन आणल्याचे उघड झाले होते.