
सामना ऑनलाईन, नांदेड
तीन वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांसह डॉ. अमित तोष्णीवाल आणि दगडूलाल बाफना यांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. पाचव्या जिल्हा न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेली विनंती अमान्य करीत या तिघांना हादरा दिला आहे.
मार्च महिन्यात वैष्णवी या ३ वर्षांच्या मुलीचा निरामय रुग्णालयात संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. वैष्णवीची आई सुधा आणि वडील पवन शर्मा यांचे पटत नव्हते. सुधा वैष्णवीला घेऊन हैद्राबादवरून नांदेडला आल्या होत्या. २३ तारखेला वैष्णवीची तब्येत खालावली असून तिला रुग्णालयात दाखल केल्याचं पवन यांना दूरध्वनीवरून कळवण्यात आलं होतं. यामुळे पवन शर्मा रुग्णालयात गेले. रुग्णालयात आपल्याला उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली असं शर्मांचं म्हणणं आहे. डॉक्टरांनी मुलीला बघूही दिलं नाही असंही पवन यांचं म्हणणं आहे. वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तिला दफन करण्याऐवदजी तिला अग्नि देत अंत्यसंस्कार केल्याचाही आरोप पवन शर्मा यांनी केला आहे.
पवन शर्मा यांनी आरोप केला आहे की त्यांची पत्नी सुधा यांना दुसरं लग्न करायचं होतं. वैष्णवी दुसऱ्या लग्नात अडतळा बनत असल्याने तिला ठार मारण्यात आलं. कोणाला संशय येऊ नये यासाठी ती आजारी असल्याचा बनाव करण्यात आला आणि यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांनी सुधा यांना मदत केली असंही पवन यांचं म्हणणं आहे. सुधा यांना ओमप्रकाश पोकर्णा यांनी या प्रकरणात मदत केल्याचा खळबळजनक आरोप पवन शर्मा यांनी केल आहे. पोलिसांनी या प्रकरणी दखल न घेतल्याने शर्मा यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.पी. घोले यांच्यासमोर पोलिसांना योग्य ते निर्देश द्यावे अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आदेश देताना न्यायाधीशांनी कुख्यात गुंड पवन शर्मा,मनोज मिठूलाल बाफना, ललिता मनोज बाफना, जयदत्त बाफना, निरामय दवाखान्याचे डॉक्टर यांच्यासह आठ जणांविरूध्द हा खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशामुळे माजी आमदार ओमप्रकाश गणेशलाल पोकर्णा, दगडूलाल मिठूलाल बाफना आणि डॉ. अमित सुभाष तोष्णीवाल या तिघांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील अॅड. यदूपत अर्धापूरकर यांनी आरोपींद्वारे करण्यात आलेल्या अटकपूर्व जामीनासाठीच्या अर्जाला विरोध केला होता. वैष्णवीचे वडील पवन वर्मा यांनीही या आरोपींना जामीन देऊ नये अशी मागणी केली होती, ज्यामुळे या आरोपींद्वारे करण्यात आलेल्या अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावण्यात आला.




























































