गांधी जयंती दिवशी अन्नदात्यावर पोलीस बळाचा वापर – डॉ. नवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit_navale

सामना प्रतिनिधी । नगर

गांधी जयंतीच्या दिवशी देशाच्या राजधानीत अन्नदात्या शेतकर्‍यांवर पोलीस बाळाचा वापर करून सरकारने हिंसेचा सहारा घेतला आहे. सरकारने असे करून सत्तेवर राहण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे. किसान सभा सरकारच्या या कृतीचा निषेध करत आहे, असे महाराष्ट्र राज्य किसान सभा सरचिटणीस अजित नवले यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. देशभर शांततेच्या मार्गाने वारंवार आंदोलने करून आपल्या व्यथा, मागण्या, अपेक्षा सरकार समोर मांडत आहे. सरकार मात्र प्रत्येक आंदोलनाच्या वेळी मागण्या मान्य करते, मान्य मागण्यांची अंमलबजावणी मात्र करण्यात येत नाही. शेतकर्‍यांचा वारंवार विश्‍वासघात करण्यात येतो. शेतकर्‍यांच्या मनात यामुळे मोठा असंतोष खदखदतो आहे. आजच्या दिल्लीच्या आंदोलनाच्या निमित्ताने हा असंतोष व्यक्त झाला आहे.

वारंवार होणारा विश्‍वासघात, धोरणे ठरविताना केला जाणारा दुजाभाव व उपेक्षा शेतकरी या पुढे सहन करणार नाहीत हा इशाराच या आंदोलनाने सरकारला दिला आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील 180 संघटना नोव्हेंबर महिन्यात लाखोंच्या संख्येने लाँग मार्च काढणार आहेत. दिल्लीच्या चारही बाजूने चार लाँग मार्च संसदेच्या दिशेने नेण्यात येणार आहेत. आजचे दिल्लीतील आंदोलन त्या विशाल लढयाची झलक आहे. सरकारने आता तरी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची दखल घ्यावी व विश्‍वासघात करणे थांबवावे. अन्यथा विश्‍वासघाताची मोठी किंमत सरकारला मोजावी लागेल असे नवले यांनी म्हटले आहे.