रात्री  मोबाईल बंद ठेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा हवाच. त्यासाठीच मग मोबाईलवर सिनेमा बघणं, त्यावर गाणी बघणं, गेम खेळणं ओघाने आलंच. आता कामातून वेळ काढून मोबाईलवर खेळणं म्हणजे ते रात्रीच्या वेळीच शक्य होतं. पण बरीच रात्र मोबाईल बघत राहिल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. डोळ्यांखालील काळी वर्तुळे ही समस्यादेखील रात्री बराच वेळ मोबाईल बघत राहिल्यानेच होऊ शकते.

शास्त्रीय भाषेतच सांगायचं तर रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलच्या वापरामुळे डोळ्यांमधील रेटिनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे डोळे कमजोर होऊन आंधळेपण येण्याचीही शक्यता असते, अशी भीती अमेरिकन मस्कुलर डिजनरेशन फाऊन्डेशनने व्यक्त केली आहे.

एकूणच रात्री बराच वेळ मोबाईल वापरत राहिल्यास मुळात झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम दिवसभर शरीरावर पडत राहातो आणि दिवसभर थकवा शरीरात तसाच राहातो. रात्री उशिरापर्यंत व्हॉट्सऍप पाहात राहाणं, आलेल्या संदेशांना उत्तरे देत राहणं यामुळे शरीरातील मेलाटोनिन हार्मोन्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ताणतणाव वाढू शकतो.

दुसरे म्हणजे रात्र रात्र मोबाईलशी खेळत राहाल तर नजर एकाग्र करणाऱ्या स्नायूंवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे दिवसा कुठल्याही एका वस्तूवर नजर स्थिर ठेवणे कठीण जाते. म्हणजेच एखादा विचार मेंदूपर्यंत नेण्याची प्रक्रिया बाधित होते. याचा परिणाम म्हणून कालांतराने डोळ्यात ग्लुकोमा (मोतीबिंदू) ही समस्या उद्भवू शकते. रात्री बराच वेळ मोबाईल पाहिल्यामुळे डोळे लाल होतात. बऱ्याचजणांना ही समस्या असते.