
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
जगाला अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी आणि ‘जय जवान, जय किसान’चा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनीच राजधानी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चोपून काढले. संपूर्ण कर्जमाफीसह विविध न्याय्य मागण्यांसाठी हजारो शेतकरी बांधव दिल्लीच्या वेशीवर धडकले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. बेछूट लाठीमार करीत अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. भयंकर पाणीहल्ला केला. यात अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले असून, देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने दिलेले आश्वासन मान्य नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी दिला आहे.




























































