
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील कपोल को-ऑपरेटिव्ह बँकेत 120 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर वर्षभरापूर्वी या बँकेला टाळे ठोकण्यात आले. परंतु हजारो ग्राहकांची आयुष्यभराची जमापुंजी बँकेत अडकून पडली आहे. हे पैसे परत मिळवण्यासाठी ग्राहकांनी कंबर कसली असून मंगळवारी सकाळी शेकडो ग्राहकांनी बँकेच्या विलेपार्ले शाखेवर धडक दिली. त्यानंतर बँकेचे घोटाळेबाज 18 संचालक आणि 6 कर्मचाऱयांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
कुणी लग्नासाठी, घरासाठी बँकेत पैसे जमा केले होते, तर कुणी मोठा फ्लॅट घेण्यासाठी तर कुणी मुलांच्या शिक्षणासाठी बँकेत पैसे ठेवले होते. परंतु बँकच बंद झाल्याने त्यांचे हे पैसेही अडकले आहेत. अशा हतबल ग्राहकांनी आज बँकेसमोर तीक्र संताप व्यक्त केला. दरम्यान, अनेक ग्राहक हताश झाले आहेत. आम्ही नवरा-बायको निवृत्त असून घराचे स्वप्न साकार करण्यासाठी जमवलेले 20 लाख रुपये बँकेत अडकून पडल्याचे ग्राहक अपोलिन डिसोझा यांनी सांगितले. तर विनोद जैसवाल या ग्राहकाने आपल्या लग्नासाठी आणि घर घेण्यासाठी जमवलेले 12 लाख रुपये बँकेत अडकल्याचे सांगितले. विक्रमसिंग राठोड यांनी 30 मार्च 2017 रोजी दिल्लीतून आपल्या फॅक्टरीसाठी 12 लाख रुपयांची एनईएफटी केली होती. पण, दुसऱयाच दिवशी बँक बंद झाली. सध्या त्यांची फॅक्टरी बंद पडली आहे.
घोटाळा कसा आणि कधी झाला?
– बँकेच्या संचालकांनी आरबीआयला बँकेला केवळ 40 कोटींची थकबाकी असल्याचे दाखवले. परंतु आरबीआयने अधिक तपास केल्यानंतर ही थकबाकी 120 कोटींपर्यंत असल्याचे उघड झाले.
– 2014 रोजी घोटाळा उघड झाल्यानतंर आरबीआयने बँकेवर प्रशासक नेमला आणि तीन वर्षे बँक चालवली.
– तब्बल 39 कर्जबुडव्यांमुळे बँक दिवाळखोरीत निघाली. पात्रता नसलेल्यांनाही कर्जवाटप करण्यात बँकेच्या संचालक आणि कर्मचाऱयांचा हात असल्याचे आरबीआयने केलेल्या तपासात उघड झाले.
– आरबीआयच्या आरोपांविरोधात संचालकांनी न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायालयाने आरबीआयच्या बाजूने निकाल दिला.
– त्यानंतर मोठय़ा थकबाकीमुळे बँक दिवाळखोरीत गेली आणि 2017 रोजी आरबीआयने बँक बंद केली.
– त्यानंतर प्रत्येकाला 10 हजारच एटीएमद्वारे काढू देण्यात आले.
– ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. ग्राहकांनी बँकेचे संचालक, कर्मचाऱयांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. परंतु त्यांना जामिनावर सोडण्यात आले. आता पुन्हा अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत ईडीला कळवण्यात येणार असल्याची माहिती पब्लिक इंटरेस्ट एफर्ट फॉर कपोल बँक संघटनेचे पदाधिकारी धवल मेहता यांनी दिली.



























































