जेव्हा भाजपवर नाराज ‘मोदी’ काँग्रेस कार्यालयात येतात, आणि …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

लखनौ येथील काँग्रेस कार्यालयात बुधवारी एकच गोंधळ उडाला. दुपारच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक कार्यालयात अवतरले आणि काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे सांगू लागले. यामुळे तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची एकच त्रेधातिरपिट उडाली. साक्षात मोदी काँग्रेसच्या कार्यालयात आले यावर कोणाचाही विश्वास बसेना. मग काय मोदी आल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वदूर पसरली आणि बघता बघता मोदींची एक झलक मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लोकांची कार्यालयाबाहेर एकच गर्दी उसळली. पण ते खरेखुरे मोदी नसून हुबेहुब त्यांच्यासारखेच दिसणारे अभिनंदन पाठक आहेत हे कळाल्यावर मात्र समस्त गावकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला.

अभिनंदन पाठक म्हणजे हुबेहुब मोदींसारखी दिसणारी व्यक्ती. त्यांच्यात आणि मोदींमध्ये इतके कमालीचे साम्य आहे की मोदींना लपवावे आणि पाठक यांना दाखवावे. अनेक वृत्तवाहिन्यांवरही मोदींचे डुप्लिकेट म्हणून पाठक मिरवताना दिसतात. लोक त्यांना आता मोदीसाहेब नावानेच संबोधू लागली आहेत. पाठक यांना मोदींबद्दल अपार आदर आहे. पण गेल्या दिवसांपासून ते भाजपवर नाराज झाले आहेत. भाजपच्या दुटप्पी धोरणांमुळे त्यांना मनस्ताप झाला आहे. यामुळे भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच ते लखनौमधील काँग्रेस कार्यालयात आले होते. काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी पाठक उत्सुक असून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी व अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पक्षात जागा द्यावी अशी मागणी पाठक यांनी केली आहे. त्यावर काँग्रेस कोणती प्रतिक्रीया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.