
सामना प्रतिनिधी । नगर
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना प्रभारी आयुक्तांच्या मान्यतेनेच नोटीस बजावण्यात आली होती. त्यात ऑडीटरला मॅनेज करण्यासाठी ते पैसे गोळा करत असल्याची तक्रार होती. स्त्रीभ्रृण हत्या, लेक वाचवा अभियानाचा याच्याशी कुठलाही संबंध नाही. याबाबत कुठलीही नोटीस मला मिळालेली नाही, असा दावा उपायुक्त प्रदीप पठारे यांनी केला आहे. दरम्यान, मनपातील प्रशासन अंतर्गत वाद चव्हाट्याव आला असताना या घटनांमुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत चालली आहे.
महापालिकेत उपायुक्त व वैद्यकीय आरोग्य अधिकार्यांनी परस्परांना काढलेल्या नोटिसीवरुन दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मुंबई येथील एकनाथ भोईर नामक व्यक्तीने केलेल्या तक्रारीनुसार डॉ. बोरगे यांना हप्ता वसूल करत असल्याची नोटीस उपायुक्तांनी बजावली होती. त्यांना खुलासा सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्या नोटिसीला डॉ.बोरगे यांनी प्रत्युत्तर देत उपायुक्त पठारे यांना ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यांतर्गत नोटीस बजावली आहे. याबाबत उपायुक्त पठारे यांना विचारले असता, अशी कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ भोईर यांनी डॉ. अनिल बोरगे हे ऑडिटरला मॅनेज करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये गोळा करत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांनी ती तक्रार माझ्याकडे सोपविल्यानंतर मी आस्थापना विभागाला टिपण्णी सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्रभारी आयुक्तांची मान्यता घेवून वैद्यकीय अधिकारी व डॉ.बोरगे यांना खुलासा मागविण्यात आला. त्यांच्याकडून अद्याप कुठलाही खुलासा सादर झालेला नाही. तसेच या प्रकरणाचा ‘लेक वाचवा’ अभियानाशी कुठलाही संबंध नसल्याचेही उपायुक्त पठारे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महानगरपालिकेमध्ये या अभियानाच्या माध्यमातून चांगलाच विषय रंगला आहे. डॉ. बोरगे यांनी उपायुक्त पठारे यांना नोटीस पाठवल्याने एकच खळबळ उडाली होती. बोरगे यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन एकत्रित माहिती घेवून ही कारवाई केली असल्याचे पुढे आले आहे. मात्र, आता उपायुक्त पठारे यांनी आपल्याला नोटीसच मिळाली नाही असा दावा केल्यामुळे मनपा मधील अधिकार्यांचे वाद आता पेटण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे अन्य अधिकार्यांना याचा फटका बसण्याची शक्यात आहे.






























































