
सामना प्रतिनिधी । कुडाळ
वातावरणातील बदलामुळे कुडाळ तालुक्यात तापसरीने जोर धरला आहे. कुडाळ ग्रामीण रूग्णालय रूग्णांनी फुल्ल झाले असून बेडही अपूरे पडत आहेत. बेड व जागेच्या अभावामुळे प्रसुती रूग्णांसह तापसरीच्या रूग्णांना एकाच वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. अपुर्या बेडमुळे तापसरीच्या रूग्णांना खाली लादीवर बेडशीट अंथरून उपचार घेण्याची वेळ आली आहे.
तालुक्यात तापसरीसह सर्दी, खोकल्याच्या रूग्णांची सरकारी व खाजगी दवाखान्यांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. कुडाळच्या ग्रामीण इस्पितळातील रूग्णांना जागा अपुरी पडत आहे. या रूग्णालयात महिन्याला सुमारे 70 ते 80 महीलांची प्रसुती होते. या महिला रूग्णांसह अन्य रूग्णांना जागे अभावी एकाच वॉर्डमध्ये ठेवले जाते. सध्या तापसरीचे रूग्णही खबरदारीच्या दृष्टीने अॅडमिट करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र 30 बेडच्या या रूग्णालयात अपुरी जागा व बेडची कमरतेमुळे सर्व प्रकारचे रूग्ण एकाच ठिकाणी उपचार घेत आहेत. शिवाय रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खाली लादीवर बेडशीट अंथरून रूग्णांना उपचार घेण्याची वेळ आली आहे. त्यातच अपुर्या औषध पुरवठ्यामुळेही रूग्णांची परवड होत आहे. या रूग्णालयात डॉक्टरांची सेवा चांगली आहे. मात्र अपुर्या कर्मचारी वर्गामूळे त्यांचीही कसरत होत आहे.































































