अनैतिक संबंधातून मुलाचा खून: चारही आरोपींना पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

भोकरदन तालुक्यातील दावतपूर येथील एका आठवर्षीय चिमुकल्याचा अनैतिक संबंधातून खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अविनाश जयकिशन मगरे, जन्मदाती आई ( २८), रामधन बाबुराव घायवट (२०), दत्ता साहेबराव घायवट (२२) या चारही आरोपींना पोलिसांनी अटक करून, जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आठ वर्षांचा मुलाच्या आईने अविनाश जयकिशन मगरे (१९), दत्ता साहेबराव घायवट (२१) आणि समाधान बापूराव घायवट यांच्याशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाला तिचा आठ वर्षांचा मुलगा यश रमेश मगरे हा अडसर ठरला. त्यामुळे आईने मुख्य आरोपी अविनाशला माझ्याशी संबंध ठेवायचे असेल तर माझ्या मुलाचा काटा काढावा लागेल, असे सांगितले. त्यानुसारच आरोपी अविनाशने दुसरा आरोपी दत्ता घायवट व रामधन घायवट यांच्या मदतीने यशला मक्याच्या हुरडा पार्टीच्या निमित्ताने दावतपूर येथील शिवारात १ ऑक्टोबर सोमवार दुपारी १२ वाजेच्या सुमारास नेले.

त्या ठिकाणी आरोपी अविनाशने दोरीचा फास यशभोवती आवळला. तर दुसरे आरोपी दत्ता घायवट व समाधान घायवट यांनी यशचे हातपाय धरले. अशा पद्धतीने त्याचा खून केला. नंतर त्यांनी परिसरात विहीर शोधली. त्यानंतर रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान यश हरवला म्हणून फिर्याद दाखल केली. परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना या फिर्यादीत संशय वाटला. त्यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी गणेश पायघन, पोलीस जमादार आसेफ, रामेश्वर शिन्नकर यांना घेऊन दावतपूर गाठले. तोपर्यंत दावतपूर शिवारातील विहिरीमध्ये यशचा मृतदेह आढळून आला.

घटनास्थळी चौकशी केल्यावर त्यांनी मृत यशच्या आईला ताब्यात घेतले होते. चौकशी अंती मुख्य आरोपी अविनाश मगरे, दत्ता घायवट, समाधान घायवट यांना ताब्यात घेतले. चारही आरोपींना विशेष जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जालना जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय यांच्यासमवेत भेट दिली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करीत आहेत. भोकरदन पोलीस ठाण्यात ४ आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३०२, २०१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.