
सामना प्रतिनिधी। बीड
बीड जिल्ह्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले असून या आजाराची लागण झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच रुग्णांना याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे, दरम्यान जिल्हा रुग्णालयात तातडीने स्वाईन फ्लू उपचारासाठी वेगळा वॉर्ड उभारण्यात आला असून डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
बीड जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात शेकडो रुग्णांमध्ये स्वाईन फ्लू ची लक्षणे आढळली आहेत. मात्र सर्दी ची ही असेच लक्षणे असल्यामुळे रुग्णामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान यातील 35 संशयित रुग्णाच्या तपासण्या करण्यात आल्या. यातील काही रुग्णाच्या तपासणीचा अहवाल आला असून त्यात पाच रुग्णांना स्वाईन फ्लू ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवडा भरात बीड मध्ये खाजगी रुग्णालयात दोन रुग्णाचा स्वाईन फ्लू ने मृत्यू झाला आहे. जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही, दोन दिवसात सर्दी नियंत्रणात आली नाही आणि स्वाईन फ्लू सारखी लक्षणे आढळून आली तर तातडीने खाजगी रुग्णालयात न जाता जिल्हारुग्णालयात दाखल व्हावे, जेवण्यापूर्वी हात धुवावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे गरज नसल्यास रुग्णालयाकडे जाऊ नये असे आवाहन डॉ थोरात आणी डॉ पवार यांनी केले आहे.




























































