चंदा कोचर यांचा राजीनामा मंजूर,संदीप बक्षी नवे व्यवस्थापकीय संचालक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोचर यांनी आपला कार्यकाल पूर्ण होण्याआधीच राजीनामा स्वीकारण्याची मागणी बँक प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार आज बँकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर आता त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढची पाच वर्षे बक्षी पदभार सांभाळतील.
3 ऑक्टोबर 2023 रोजी ते निवृत्त होतील.

कर्ज देण्यात अनियमितता आढळल्याप्रकरणी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांची सीबीआयमार्फत चौकशी सुरू आहे. कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर करण्यात आलेल्या कथित आरोपांबाबत कसून तपास केला जात आहे. परंतु कोचर यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीचा बँकेच्या कामकाजावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचे बँकेने म्हटले आहे. चंदा कोचर आणि आयसीआयसीआय बँकेशी संबंधित प्रकरणांचा ‘सेबी’सह आरबीआय आणि कॉर्पोरेट अफेयर मंत्रालयाकडूनही तपास सुरू आहे. सीबीआयने मार्चमध्येच कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची प्राथमिक चौकशी केली होती. तर एप्रिलमध्ये कोचर यांचे दीर राजीव कोचर यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती.

राजीनाम्यानंतर शेअर्स वधारले

चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सचा भाव गुरुवारी चांगलाच वधारला. बँकेच्या शेअर्समध्ये 5.69 टक्क्यांची वाढ होऊन तो 320.90 रुपये इतका झाला तर राष्ट्रीय शेअर बाजारातही कंपनीच्या शेअर्समध्ये 5.77 टक्क्यांनी वाढून तो 321.25 रुपयांवर पोहोचले.