
सामना प्रतिनिधी । पुणे
पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात रोज तब्बल २०० एमएलडीने कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहराला रोज १३५० ऐवजी केवळ ११५० एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यातच शहरात पाणी कपातीचा कुठलाही निर्णय घेतला गेला नाही. याउलट टॉप टू बॉटम सर्वांना समान पाणीवाटप करण्याचे निश्चित झाले आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. त्यामुळे अखेर पुण्याच्या पाणी कपातीवरून भाजपमध्येच कालवाकालव सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
खडकवासला कालवा समितीची बैठक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झाली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये सध्या २७ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीसाठी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
धरणांमध्ये २७ टीएमसी पाणीसाठा असला, तरी भाजपच्या तुघलकी कारभारामुळे पुणेकरांवर पाणी संकट ओढवले आहे. पालिका सध्या रोज १ हजार ३५० ते १ हजार ६०० एमएलडी पाणी घेत आहे. त्यात पुढील आठवड्यापासून आता केवळ ११५० एमएलडी इतका पाणीपुरवठा होणार असल्याने शहराच्या पाण्यात कपात करावी लागणे अटळ होणार आहे. सद्यस्थितीला मध्यवस्तीत दोन वेळेस, तर उपनगरांत एकवेळेस पाणीपुरवठा होतो. कपातीच्या निर्णयानंतर सर्व शहरात एक वेळेसच पाणीपुरवठा केला जाऊ शकतो.
पाणीसाठ्यात वाढ नाही
पुणे शहराची लोकसंख्या सुमारे ३५ लाख आहे. त्याचबरोबर ५ लाख नागरिक विविध कामांसाठी पुणे शहरामध्ये येतात. महापालिकेत ११ गावांचा समावेश झाल्यामुळे ३ लाख लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. ११.५ टीएमसी पाण्याचा महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यामध्ये करार झालेला आहे. वारंवार पाणीसाठ्याची मागणी करूनही पाणीसाठा वाढवून देण्यात येत नाही. महापालिकेची हद्दवाढ झाली. त्याचबरोबर मुंढवा जॅकवेलमधून कालव्यात पाणी सोडण्यात येत असले, तरी पाणीपुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही.
पाणीसाठा समाधानकारक नसल्यामुळे कपात – महापौर
शहराला वर्षभर पाणी पुरवण्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून आत्तापासूनच उपाययोजना करण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासन, सर्व पक्षांचे गटनेते यांच्यात एकत्रित बैठक घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी सांगितले.
पाणी कपात नाही – पालकमंत्री बापट
पाणी कपातीचा कुठलाही निर्णय घेतला गेला नाही. याउलट टॉप टू बॉटम सर्वांना समान पाणी वाटप करण्याचे निश्चित झाले आहे. धरणाच्या कार्यक्षेत्रात कमी पाऊस झाल्याने यंदा पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी आम्ही टॉप टू बॉटम पद्धतीने कालव्यातील पाण्याचे वितरण करणार आहोत. शेती व पिण्यासाठी पुरेसे पाणी राखून ठेवण्याचे योग्य नियोजन करीत आहोत, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. महापौर मुक्ता टिळक या पाणी कपातीबाबत एक विधान, तर बापट हे त्यांच्या परस्पर दुसरे विधान करीत आहेत. अखेर पुण्याच्या पाणी कपातीवरून भाजपमध्येच कालवाकालव सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
नियोजनाच्या अभावाचा फटका
कालव्यातून चोरून पाणी सोडले जात होते. अतिरिक्त पाणी सोडत होते. कालवा फुटल्यामुळे आता पाणीचोरी करता येणार नाही. नियोजनाचा अभाव असल्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट आले आहे. २४ तास पाणीपुरवठा योजना गुंडाळून ठेवणार का? असा सवाल विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला.
शहराचे आमदार गेले कुठे?
कालवा समितीची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार अजित पवार, शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे, दत्तात्रय भरणे, प्रा. मेधा कुलकर्णी, राहुल कुल उपस्थित होते. शहरात भाजपचे आठ आमदार असताना, या बैठकीला केवळ गिरीश बापट आणि प्रा. मेधा कुलकर्णी हेच दोन आमदार होते. महत्त्वाच्या प्रश्नावर शहराची बाजू मांडणे आवश्यक असताना अन्य आमदार गेले कुठे? असा सवाल केला जात आहे.





























































