राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी प्रथमच सिंधुदुर्गात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

राज्य शासनाची राज्य नाट्य स्पर्धा गेली 58 वर्षे सुरु असून या राज्य नाट्य स्पर्धेचे कोकण विभागीय सेंटर रत्नागिरीला होते. मात्र आमदार वैभव नाईक यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचे योगदान ठरणारी ही स्पर्धा प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेतली आहे. या राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर महिन्यात मालवण मामा वरेरकर नाट्यगृहात होणार आहे. याबद्दल नाट्य परिषद व मालवण मधील सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक पंकज सादये, नितीन वाळके, किरण वाळके, बाळ महभोज, सुनीता जाधव, रवी तळाशिलकर गणेश कुडाळकर , नंदू गवंडी, अमित भोगले, यशवंत गावकर. आदी उपस्थित होते.

ही नाट्य स्पर्धा मलावण मध्ये होत असल्याने मालवणच्या सांस्कृतिक इतिहासातील सुवर्णपान असणार आहे. नाट्य परिषदेच्या मालवण शाखेच्या मागणीवरून आमदार वैभव नाईक यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून ही नाट्य स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेतली आहे. यानिमित्त्ताने जिल्ह्यातील नाट्यसिकांना दर्जेदार नाटके पाहण्याचा योग येणार आहे. या राज्य नाट्य स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी नाट्य परिषदेच्या मालवण शाखेने स्वीकारली असून यासाठी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, व सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभणार आहे. नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचेही मार्गदर्शन या उपक्रमासाठी मिळणार आहे. रोज सायंकाळी 7 ते 9,30 या वेळेत या स्पर्धेतील नाटके जिल्ह्यातील नाट्यरसिकांना पाहता येणार आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.