
सामना प्रतिनिधी । लातूर
गंज गोलाई परिसरातील भाजीवाले/फळवाले व इतर पथविक्रेते तसेच पानटपरीवाले व छोटे मोठे व्यापारी भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. त्या ठिकाणी वारंवार सूचना देऊनही कचरा टाकणाऱ्यांवर शुक्रवारी सकाळी लातूर शहर महानगर पालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्वत: पाहणी करून कचरा करणाऱ्यांवर व अतिक्रमण केल्याबद्दल कारवाई करण्याचे आदेश दिले व जागेवर ३ हजार रु दंड वसूल केला.
सुभाष चौक परिसरातील लातूर फ्लॉवर तसेच शेख सलीम इनामदार व सतीश बिराजदार याच्यावर कारवाई करून दंड वसूल केला गेला. यावेळी गोलाई परीसरातील व्यापारी वर्गास स्वच्छतेबद्दल माहिती देण्यात आली व कचरा दिसल्यास लातूर मनपाच्या वतीने कारवाई करण्यात येईल. याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच प्लास्टिक वापर केल्यास ५ हजार रु दंड जागेवर आकारण्यात येईल हे ही पुन्हा सांगण्यात आले, तसेच यापुढे दररोज कारवाई मोहीम राबविण्यात येणार आहे, तरी व्यापारी वर्ग व पथ विक्रेते, नागरिकांनी कचरा हा घंटा गाडीतच टाकावा व आपल्या कडे जमा होणारा कचरा हा ओला व सुखा पद्धतीने जमा करून घंटा गाडीकडे द्यावा, असे आवाहन लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे तसेच लातूर शहरातील अतिक्रमण केलेल्या व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा मनपाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी यावेळी उपस्थित व्यापारी व नागरीकांना सांगितले. सदरील कारवाई आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी वाघमारे, सहायक आयुक्त वसुधा फड, दिलीप चीद्रे, समीर मुलाणी, संजय कुलकर्णी, सुर्यकांत राउत, समाधान सूर्यवंशी, सोनवणे, सहदेव बोराडे, अकबर शेख, रवी कांबळे, अभियंता घंटे, अमजद शेख व अतिक्रमण विभागातील सर्व कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक यांनी केली.





























































